संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
कोरोना संसर्गाच्या दोन वर्षांच्या महाभयंकर कालावधी नंतरच्या दहीहंडी आणि गणेशोत्सवानंतर आता राज्यात दिवाळी सुद्धा तश्याच धुमधडाक्यात साजरी होणार आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. दिवाळीत संपूर्ण मुंबई उजळून निघणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. राष्ट्रीय अभियंता दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली आहे. गणेशोत्सवात अनेक सेलिब्रिटी आले, ते माझ्याशी बोलले, सरकारबद्दल चांगले किंवा वाईट मत बनवणे हे अधिकार्यांवर अवलंबून असते. मुंबईत आमूलाग्र बदल होणार आहेत. रस्त्यांच्या दर्जाकडे लक्ष द्या, तुम्ही खर्च केलेला पैसा वाया घालवू नका. यामुळे ‘काहींना टीका करण्याची संधी मिळते, जी त्यांना मिळणार नाही,’ असे मुख्यमंत्र्यांनी अभियंत्यांना संबोधित करताना सांगितले.
‘पूर्वी माझ्याकडे कमी अधिकार होते. मुख्यमंत्री झाल्यानंतर मी आयुक्त चहल यांना फोन केला. साडेपाच हजार कोटींच्या रस्त्यांचे काम सुरू झाले आहे. दोन वर्षांत मुंबई खड्डेमुक्त होणार. ठाणे-नवी मुंबईत जे सुशोभीकरण केले आहे तेच आपणही करू’, असे एकनाथ शिंदे यांनी अभियंत्यांना सांगितले.
‘लोकांना हा आपला मुख्यमंत्री वाटतो, म्हणून ते फोटो काढायला येतात. मी अधिवेशनात विरोधकांना चोख उत्तर देतो. मी सर्व काही साठवले आहे. ‘वेदांता कंपनी’चा विषय खूप गाजतोय, त्यांनी अडीच वर्षात काहीच केले नाही. आम्ही दोन महिन्यांत प्रयत्न केला पण कंपनीने आधीच गुजरात येथे जाण्याचा निर्णय घेतला होता. आता मी माझ्या कामावरून उत्तर देईन. याबाबत पंतप्रधानांशी चर्चा केली. त्यांनी राज्यात मोठे प्रकल्प आणण्याचे आश्वासन दिले आहे,’ असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना सांगितले.