संपादक: मोईन सय्यद / नांदेड प्रतिनिधी
मराठवाड्यातील नांदेड शहरातील एका खाजगी रुग्णालयानं कोरोनाबाधित रुग्णाच्या नातेवाईकांकडून अधिकचे पैसे उकळण्यासाठी संबंधित रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतरही 3 दिवस उपचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संबंधित रुग्णालयानं कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर विविध औषध आणि उपचाराच्या नावाखाली पीडित नातेवाईकांचे लाखो रुपये उकळले आहेत. त्याचबरोबर रुग्णावर काय उपचार केला, याचा तपशील मागितला असता आणखी 40 हजार रुपयांची मागणी केली.
याप्रकरणी मृत रुग्णाच्या पत्नीनं न्यायालयाचे दरवाजे ठोठावल्यानंतर संबंधित रुग्णालयातील सर्वच डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचा आदेश न्यायालयानं दिला आहे. यानंतर शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गोदावरी हॉस्पिटल तसंच येथील सर्व डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणूक करणे, उपचारात निष्काळजीपणा करणे, अशा विविध कलमांतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास शिवाजी नगर पोलीस करत आहेत.
पीडित महिलेनं दिलेल्या माहितीनुसार, नांदेड शहरातील मुजामपेठ येथील रहिवासी असणाऱ्या अंकलेश पवार यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. यानंतर अंकलेश यांना 16 एप्रिल रोजी त्यांच्या नातेवाईकानी गोदावरी कोविड रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं होतं. 19 एप्रिल रोजी त्यांची प्रकृती अचानक खालावली. त्यामुळे त्यांना अतिदक्षता विभागात हलवण्यात आलं. दुसरीकडे, नातेवाईकांकडून पैशांसाठी डॉक्टरांचा तगादा सुरूच होता. 21 एप्रिल ते 24 एप्रिल दरम्यानच्या तीन दिवसांत डॉक्टरांनी फिर्यादी शुभांगी पवार यांच्याकडून दीड लाख रुपये घेतले.