आपलं शहर

पक्षाघात रूग्णांसाठी आता ग्लोबल रूग्णालयात ‘सेकंड ओपिनियन’ क्लिनिक सुरू ऑनलाईन पद्धतीने रूग्णांना मिळणार डॉक्टरांचा सल्ला

मुंबई, प्रतिनिधी : पक्षाघात (ब्रेन स्ट्रोक) म्हणजे मेंदूचा तीव्र झटका येणं या आजाराने पिडीत असणा-या रूग्णांची संख्या अधिक आहे. वर्ल्ड स्ट्रोक ऑर्गनायझेशन (डब्ल्यूएसओ) च्या माहितीनुसार जगभरात ८० दशलक्ष लोक पक्षाघाताच्या आजाराने त्रस्त आहेत. पक्षाघाताचा झटका आलेल्या व्यक्तीचे आयुष्य वाचवण्यासाठी वेळेवर निदान आणि त्वरित उपचार करणं आवश्यक आहे.

अशा रूग्णांवर उपचार हे त्यांच्या वैदयकीय स्थितीनुसार भिन्न असतात. रूग्णांची स्थिती लक्षात घेऊन काय उपचार द्यावेत हे डॉक्टर ठरवतात. पण अनेकदा काही रूग्णांना आपल्या आजारासाठी दुसऱ्या डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा असतो. अशा रूग्णांच्या भावना लक्षात घेऊन परळ येथील ग्लोबल रूग्णालयाने पक्षाघाताचा झटका आलेल्या रूग्णांसाठी आता सेकंड ओपिनियन क्लिनिक सुरू केले आहे.
हे क्लिनिक सोमवार ते शुक्रवार सुरू शकणार आहे. या क्लिनिकच्या माध्यमातून रूग्णांना ऑनलाईन डॉक्टरांचा सल्ला घेता येईल. याशिवाय रूग्णालयात जाणून डॉक्टरांची प्रत्यक्ष भेटही घेता येईल.

पक्षाघात रूग्णांची वाढती संख्या विचारात घेता समाजात स्ट्रोक विषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी रूग्णालयातर्फे विविध कार्यक्रम, मोहीम राबवली जात आहे. अशातच आता पक्षाघाताचा झटका आलेल्या रूग्णांना आपल्या आजाराबद्दल दुसऱ्या डॉक्टरांचा सल्ला घेता यावा, यासाठी सेकंड ओपिनियन क्लिनिक सुरू केले आहे. या क्लिनिकद्वारे पक्षाघाताने पिडीत रूग्णांना त्यांच्या उपचाराबद्दल अचूक सल्ला मिळण्यास मदत होणार आहे. सुप्रसिद्ध मेंदूविकार आणि स्ट्रोक तज्ज्ञ डॉ. शिरीष एम हस्तक या क्लिनिकचं काम पाहणार आहेत.

परळ येथील ग्लोबल रूग्णालयातील स्ट्रोक आणि न्यूरोक्रिटिकल केअर प्रादेशिक संचालक डॉ. शिरीष एम हस्तक म्हणाले की, ‘‘पक्षाघाताचा झटका आलेल्या रूग्णांच्या नातेवाईकांना उपचाराबाबत दुसरा सल्ला मिळावा, यासाठी हे क्लिनिक सुरू करण्यात आले आहे. याद्वारे पक्षाघाताचा त्रास असणाऱ्या रूग्णांची वैद्यकीय स्थिती जाणून रुग्णाला इतर कोणत्याही उपचाराची आवश्यकता आहे की नाही हे सुद्धा सांगितले जाईल.

रक्तदाब, कोलेस्ट्रॉल किंवा मधुमेह यांसारख्या जोखीम घटकांच्या व्यवस्थापनावर अतिरिक्त लक्ष केंद्रित केले जाईल. रुग्णांना फिजिओथेरपी आणि पुनर्वसन करण्याचा सल्ला दिला जाईल. पक्षाघातामुळे पिडीत रूग्णांचे प्राण वाचवणे हा क्लिनिक सुरू करण्यामागील मुख्य उद्देश आहे.”

ग्लोबल रूग्णालय (मुंबई) मुख्य कार्य़कारी अधिकारी डॉ. विवेक तलौलीकर म्हणाले की, ‘‘पक्षाघाताचे त्रस्त असणाऱ्या लोकांना या क्लिनिकमुळे खूप फायदा होणार आहे. स्ट्रोक चा झटका आलेल्या रूग्णांना वेळीच निदान व उपचार झाल्यास रूग्ण पटकन बरा होऊ शकतो. या दृष्टीकोनातून पक्षाघात रूग्णांवर लवकरच उपचार मिळावेत हा आमचा उद्देश आहे. या शिवाय क्लिनिकमुळे स्ट्रोकच्या रूग्णांचे आयुष्य सुधारण्यास मदत होईल.’’

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *