संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायम सिंह यादव यांचे आज ८२ व्या वर्षी दिल्ली येथे निधन झाले. मागील महिन्यात त्यांना रक्तदाबाच्या विकाराने ग्रासल्याने दिल्ली येथील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथेच त्यांनी आज सकाळी अखेरचा श्वास घेतला.
मुलायम यांचा जन्म २९ नोव्हेंबर १९३९ साली उत्तर प्रदेशमधील इटावा येथे झाला होता. मुलायम सिंह यादव हे अगदी तरुण वयात समाजवादी नेते डॉ. राममनोहर लोहिया यांनी केलेल्या आंदोलनात सहभागी झाले. प्रदेशामध्ये नेताजी या नावाने परिचित असलेल्या मुलायम सिंह यांनी १९९२ साली समाजवादी पक्षाची स्थापना केली. आठवेळा उत्तर प्रदेश विधानसभेवर निवडून गेले होते. १९८९, १९९३ आणि २००३ असे तिन वेळा त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रीपद भूषवले आहे.
उत्तर प्रदेशच्या राजकारणावर आपली छाप पाडणाऱ्या मुलायम सिंह यादव यांनी केंद्रामध्येही संरक्षण मंत्रीपदासारखी महत्त्वाची भूमिका पार पाडली. एच.डी. देवेगौडा आणि त्यानंतर इंद्रकुमार गुजराल पंतप्रधान असताना १ जून १९९६ ते १९ मार्च १९९८ दरम्यान मुलायम सिंह यादव हे संरक्षण मंत्री होते. त्यांच्या निधनामुळे देशातील समाजवादी विचारांनी राजकारणाची मांडणी करणाऱ्या एका मोठ्या चळवळीचे मोठे नुकसान झाल्याचे मानले जात आहे.
त्यांच्या पश्चात त्यांचे पुत्र अखिलेश यादव हे समाजवादी पक्षाची धुरा सांभाळत आहेत. अखिलेश यांनी २०१२ मध्ये देशातील सर्वांत कमी वयाचे मुख्यमंत्री म्हणून वयांच्या ३८ व्या वर्षी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती.