आपलं शहर

बालाजी गार्डन सोसायटीचा कचरा महापालिकेने उचलण्यास बंद केल्याने रहिवाश्यांनी विचारला जाब..

प्रतिनिधी: अवधुत सावंत (डोंबिवली)

डोंबिवली जवळील कोपर येथील बालाजी गार्डनमध्ये ९ सोसायट्या असून जवळपास ५२२ सदनिका आहेत. या सोसायटीचा ओला कचरा १०० किलो पेक्षा अधिक होत असून ही घनकचरा व्यवस्थापनाच्या नियमानुसार सोसायटीकडून त्यांची विल्हेवाट लावली जात नाही. त्यामुळे कल्याण – डोंबिवली महापालिका प्रशासनाकडून त्यांचा कचरा गेल्या तीन-चार दिवसांपासून उचलला जात नाही व त्यामुळे दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे संतप्त नागरिकांनी मनसे आमदार प्रमोद (राजू) पाटील यांची भेट घेऊन परिस्थितीची माहिती दिली. आमदार पाटील यांनी रहिवाश्यांना घेऊन डोंबिवली विभागीय कार्यालयात घनकचरा व्यवस्थापन उपायुक्त रामदास कोकरे यांची भेट घेतली.

घनकचरा व्यवस्थापनाच्या नियमानुसार ज्या सोसायटीचा कचरा १०० किलो पेक्षा अधिक होत असेल त्यांची विल्हेवाट सोसायटीनेच लावायची आहे. कोपर येथील बालाजी गार्डन या सोसायटीचा कचरा देखील १०० किलो पेक्षा अधिक होतो. परंतु सोसायटीच्या आवारात कचरा विल्हेवाट लावण्यासाठी जागा नाही. गेल्या दोन दिवसात पालिकेने कचरा उचलला नाही याचा जाब विचारण्यासाठी रहिवाशी डोंबिवली विभागीय कार्यालयात आले होते.यावेळी रहिवाश्यांबरोबर मनसे आमदार प्रमोद (राजू) पाटील ही उपस्थिती होते.

यावेळी प्रभाग क्षेत्र अधिकारी सुधाकर जगताप, राजेश सावंत, संजय रोकडे आणि सोसायटीतील रहिवासी यांच्यात यासंदर्भात चर्चा झाली. बालाजी गार्डनमध्ये एकूण नऊ सोसायटी असून सदानिकांची संख्या ५२२ इतकी आहे. या सोसायटीतील रहिवाश्यांची लोकसंख्या दोन हजारांच्या आसपास आहे. सोसायटी वर्षाला ५५ लाख रूपये मालमत्ता कर महापालिकेला भरते. गेल्या दोन-तीन वर्षापासून महानगरपालिकेच्या निर्देशानुसार ओला आणि सुका कचरा वर्गीकरण पालिकेच्या गाडय़ांकडे दिले जाते. परंतु गेल्या तीन-चार दिवसांपासून महानगरपालिकेने कोणतेही पूर्वसूचना न देता सोसायटीतील कचरा उचलणे बंद केले आहे.

सध्या कोरोना महामारीची परिस्थिती आहे. या परिस्थितीत कचरा न उचलणो म्हणजे कोरोना किंवा इतर रोगांना आमंत्रण देण्यासारखे आहे. सोसायटीतील लहान मुले, वृध्द आणि गरोदर स्त्रिया यांना देखील ह्या दुर्गंधीचा त्रास होऊ शकतो. सोसायटीतील कुणीही व्यक्ती आजारी पडल्यास त्यांची जबाबदारी कल्याण-डोंबिवली महापालिकेची असेल असा इशारा त्यावेळी सोसायटीच्या वतीनें महापालिकेला देण्यात आला. सध्या कोरोना परिस्थिती असल्याने आर्थिक व मानसिक दबावाखाली सर्व रहिवासी असून त्यात महापालिकेने कचरा उचलणे बंद केल्याने रहिवासी आणखीनच विवंचनेत पडले आहेत. दर वर्षाला मालमत्ता कर न चुकता भरतो तरीही हा अन्याय का ? असा सवाल रहिवाश्यांनी निवेदनातून विचारला आहे.

या यासंदर्भात रामदास कोकरे यांना विचारले असता ते म्हणाले, घनकचरा व्यवस्थापनाच्या नियमानुसार पर्यावरण ना हरकत दाखला मिळाला आहे त्या सोसायटीनेच ओला कचऱ्याची विल्हेवाट लावणे गरजेचे आहे. ही सोसायटी कचऱ्याची विल्हेवाट लावत नाही ती त्यांची चूक आहे. पुढील काळात सोसायटीनेच कचऱ्याची विल्हेवाट लावावी असे ही ते म्हणाले. तसेच कोकरे यांनी उद्यापासून सोसायटीचा कचरा उचलला जाणार आहे. सात दिवसांनी एक बैठक घेण्यात येईल असे ही त्यांनी सांगितले.

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *