Latest News आपलं शहर गुन्हे जगत

मासेमारीच्या बोटीतून हातभट्टी दारूची तस्करी; उत्तन सागरी पोलिसांनी केली मच्छिमार दाम्पत्यास अटक

संपादक: मोईन सय्यद / मिरा भाईंदर, प्रतिनिधी

मासेमारीच्या बोटीतुन हातभट्टीच्या गावठी दारूची तस्करी केली जात असल्याच्या प्रकार उत्तन सागरी पोलिसांनी उघडकीस आणला असून खोल समुद्रात जाऊन पोलिसांनी कारवाई करून मासेमारीच्या बोटीसह मच्छीमार दाम्पत्यास अटक केली आहे.

एक इसम हा बोटीद्वारे गावठी हातभट्टीची दारु उत्तन येथे विक्री करीता आणणार असल्याची माहिती उत्तन सागरी पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेले पोलीस शिपाई गौरव साळवी यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती, माहितीची शहानिशा केल्यानंतर उत्तन सागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत लांगी यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी रात्री उप निरीक्षक कुरवाड व उबाळे सह साळवी आदींचे पथक भुतोडी बंदर येथे पोहचले. हातभट्टीची दारु असलेली बोट ही समुद्रात असल्याचे कळताच तेथे जाण्यासाठी मच्छीमार सुप्रीयन जुरान यांची रहस्यमय ही मासेमारी बोट घेऊन पोलीस पथक समुद्रात गेले.

समुद्रात उभी असलेली सहारा उर्फ चल बेटा ह्या मच्छीमार बोटीवर रात्री पावणे दहाच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकला. त्यावेळी बोटीत असलेला राजेश डमनिक नुन हा छोट्या होडीच्या सहाय्याने पळून गेला. सदर बोटीवर पोलिसांना ४ मोठ्या कॅन मध्ये भरलेली हातभट्टीची ४१० लिटर इतकी दारू आढळून आली. पोलिसांनी दारूचा साठा व ५ लाख किमतीची मासेमारी बोट जप्त केली. सदर बोट हि राजेश व त्याची पत्नी प्रज्ञा नून ह्या दोघांच्या मालकीची असल्याने उत्तन पोलिसांनी नून दाम्पत्यावर गुन्हा दाखल केला आहे.

मासेमारीसाठीच्या बोटीतून कायदयाने बंदी असून देखील जीवघेण्या हातभट्टीच्या दारूची तस्करी केली जात असल्याने उत्तन परिसरातील मच्छीमारांनी संताप व्यक्त केला असून आरोपीना बेड्या ठोकून बोटीचा परवाना कायमचा रद्द करावा अशी मागणी मच्छीमार नागरिकांकडून केली जात आहे.

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *