संपादक: मोईन सय्यद/ बोईसर प्रतिनिधी
सरावली ग्रामपंचायत हद्दीतील ओसवाल एंपायर परीसरातील हॉटेल कलश ते गणेश मंदीर दरम्यानच्या रस्त्यावर एलईडी स्ट्रीट लाईटस बसविण्याचे काम ग्रामपंचायती मार्फत सुरू करण्यात आले असून यामुळे कायम अंधारात राहणारा हा परीसर एलईडी दिव्यांनी उजळून निघणार आहे.
सरावली ग्रामपंचायत मार्फत ओसवाल एंपायर परीसरातील हॉटेल कलश ते गणेश मंदीर पर्यंतच्या रस्त्यावरील दुभाजकामध्ये वीजेचे पोल टाकण्याचे काम पूर्ण करण्यात आले असून त्याठिकाणी लवकरच एलईडी दिवे लावण्यात येणार आहेत. या रस्त्यावरील वीजेचे खांब गंज लागून जीर्ण झाल्यामुळे तसेच त्यावरील दिवे बंद पडल्यामुळे अनेक दिवंसापासून परीसरात अंधाराचे साम्राज्य होते. त्यामुळे रस्त्यावरून जाणारे वाहन चालक आणि पादचारी यांना त्रास होत होता. त्यातच बोईसर सरावली भागात अंधाराचा फायदा घेऊन सोनसाखळी चोर्या, लूटमार आणि घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने राहीवाश्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊन रहीवाश्यांना रात्रीच्या सुमारास बाहेर पडणे त्रासदायक होत होते.
सरावली ग्रामपंचायतीने सध्या कलश हॉटेल ते गणेश मंदीरापर्यंतच्या रस्त्यावरील दुभाजकामध्ये नवीन विजेचे खांब बसविले असून त्याठिकाणी लवकरच एलईडी दिवे लावण्याचे काम सुरू होणार आहे. त्यामुळे अंधाराचा सामना करणार्या ओसवाल एंपायर परीसरातील नागरीकांनी ग्रामपंचायतीच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले आहे.