संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
महाराष्ट्रातल्या पोलीस भरतीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. शासनाकडून पोलीस भरतीचा जीआर काढण्यात आला आहे. शासनाच्या जीआरमुळे तब्बल ११ हजार ४४३ पदं भरली जाणार आहेत. महाराष्ट्र पोलिसांची रिक्त असलेली १०० टक्के पदं भरण्याला मान्यता देण्यात आली आहे.
राज्यातील पोलीस खात्यामध्ये पोलीस शिपाई संवर्गामध्ये पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक आणि सशस्त्र पोलीस शिपाई अशी एकूण ११ हजार ४४३ पदं भरली जातील. महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एमपीएससी कक्षेतील पदं वगळता अन्य पदं ५० टक्के पद भरण्यास राज्य शासनाकडून परवानगी देण्यात आली आहे. राज्याच्या पोलीस दलात रिक्तपदे वाढली असून सततचा बंदोबस्त आणि वाढलेल्या गुन्हेगारी खटल्यांचा तपास करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. या पार्श्वभूमीवर आता २०२० आणि २०२१ मधील तब्बल १९ हजार ७५८ रिक्तपदांची दोन टप्प्यात भरती होईल.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, येत्या आठवडाभरात १८ हजार पोलीसांच्या भरतीची जाहिरात निघणार आहे. मुख्यमंत्र्यांनी इतर विभागांना आदेश दिलेले आहेत की, ज्या कोणत्या विभागांमध्ये जागा रिकाम्या असतील त्या जागांचा रिपोर्ट तयार करावा आणि विभागानुसार लवकरच नोकरीची जाहिरात काढावी, यामुळे अजून इतर वेगवेगळ्या विभागातील जाहिराती निघण्याची शक्यता आहे. महिनाभरापूर्वी मुख्यमंत्र्यांकडून पोलीस भरतीची घोषणा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिनाभरापूर्वी पोलीस भरतीची घोषणा केली होती. राज्यात साडेसात हजार पदांसाठी लवकरच पोलिस भरती प्रक्रिया राबवणार असल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं होतं. तसंच गृह विभागाचे सचिव आणि इतर अधिकाऱ्यांना तातडीने भरती प्रक्रिया राबवण्यासाठी सूचना दिल्याचंही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी बोलताना सांगितलं होतं.