Latest News आपलं शहर

जव्हारच्या आश्रमशाळेतील दहावीची मुलगी गर्भवती? रक्तस्त्राव व उलट्या झाल्याने प्रकार आला उघडकीस!

अवधुत सावंत, प्रतिनिधी : पालघर जिल्ह्यातील आदिवासी विकास प्रकल्प जव्हार अंतर्गत येणाऱ्या साकुर येथील एका आश्रमशाळेतील इयत्ता दहावीत शिक्षण घेत असलेली मुलगी गरोदर असल्याचं समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली असून सगळ्यानाच मोठा धक्का बसला आहे.
वैद्यकीय तपासणी केल्यानंतर विद्यार्थिनी दोन महिन्यांची गर्भवती असल्याचं निष्पन्न झालं आहे.
मुलीला अचानक रक्तस्राव आणि उलट्या सुरू झाल्यानंतर तिला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

जव्हार तालुक्यातील ८ किमी अंतरावर असलेल्या आश्रमशाळेतील एका मुलीला शाळेत असताना रक्तस्राव व उलट्या होऊ लागल्या.
त्यामुळे तिला प्रथम प्राथमिक आरोग्य केंद्र साकुर येथे शाळेतील महिला अधिक्षिकांनी उपचारासाठी दाखल केलं.
तिथे तिची गर्भ चाचणी करण्यात आली असता ती गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले.
त्या नंतर त्या विद्यार्थिनीला पुढील उपचारासाठी जव्हारच्या कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले.
तिच्यावर उपचार सुरू असताना तिला पुन्हा खूप रक्तस्राव सुरू झाले.
त्यामुळे तिची प्रकृती खालावत होती म्हणून तिला नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात असून, तेथे तिची पुन्हा वैद्यकीय चाचणी करण्यात आली.
त्यात ती विद्यार्थिनी दोन महिन्यांची गर्भवती असल्याचे उघड झाले आहे.
तिच्यावर पुढील उपचार सुरू आहेत.

तिच्यासोबत शाळेतील महिला अधीक्षक व मुलीचे पालक आहेत.
साकुर येथील ही आश्रमशाळा पहिली ते बारावी पर्यंतची निवासी कन्या शाळा आहे.
येथे नववी ते बारावीचे वर्ग सुरू असून, वसतिगृहात १५६ विद्यार्थी पट संख्या आहे.
तर शाळेत ११५ विद्यार्थी उपस्थितीत असतात. ही मुलगी ७ फेब्रुवारी रोजी पासून शाळेत उपस्थित आहे.

गावातील एका मुलासोबत तिचे प्रेमसंबंध होते परंतु विद्यार्थिनीचे कुणाशी संबंध होते? आणि ती नक्की कुणामुळे गर्भवती झाली? हे अजून स्पष्ट झाले नसून आश्रमशाळेतील एक अल्पवयीन विद्यार्थिनी अशा प्रकारे गर्भवती झाल्याने येथील विद्यार्थिनींच्या सुरक्षे विषयी गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *