संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
मुंबईत रिक्षा, टॅक्सी चालकांचीही कोरोना चाचणी करण्याचा निर्णय मुंबई पालिकेने घेतला आहे. पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधित विभागांना बैठकीत तशा सूचना दिल्या आहेत. त्यानुसार मुंबईतील विविध भागांत पालिकेकडून चाचणीसाठी शिबीरे घेण्यात येतील. चालकांना कोरोना चाचणीची सक्ती करण्यात आली नसली तरी त्यांना चाचणीसाठी पुढे येण्याचे आवाहन मात्र पालिकेने केले आहे.
दुसऱ्या लाटेत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने गर्दीच्या ठिकाणी दररोज ५० हजार चाचण्या करण्याचे उद्दिष्ट गेल्या मार्च महिन्यापासून ठेवले होते.
यामध्ये समुद्र किनारे, मॉल, खाऊगल्ल्या अशा सार्वजनिक ठिकाणी चाचण्या करण्याचे पालिके ने निश्चित केले व त्यानुसार चाचण्याही केल्या.
सध्या मुंबईत कोरोना रुग्णसंख्या जरी कमी होत असली तरीही पालिके ने जास्तीत जास्त चाचण्या करण्यावर भर दिलाच आहे. त्यानुसार आता मुंबईत धावणाऱ्या रिक्षा, टॅक्सी चालकांचीही चाचणी केली जाणार आहे.
चालक दिवसभरात अनेक प्रवाशांच्या संपर्कात येत असतात.
घरी गेल्यानंतर पत्नी, मुलांच्याही संपर्कात येतात. त्यामुळे धोका न पत्करता त्यांची चाचणी करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मुंबई पालिके चे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.
चालक बाधित आढळल्यानंतर तात्काळ कुटुंबीयांतील सदस्यांचीही चाचणी होणार आहे.
रिक्षा, टॅक्सी स्टॅण्ड, रेल्वे स्थानकाबाहेरील थांबे येथे कोरोना चाचणीसाठी शिबिरे घेतली जाणार असून चालकांना कोणतीही सक्ती केली जाणार नसल्याचे स्पष्ट केले.
या संदर्भात विविध रिक्षा, टॅक्सी संघटनांनाही कल्पना दिली जाणार आहे.