मिरा भाईंदर, प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, ठाणे-पालघर प्रभारी तथा गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत मनसेच्या महिलाध्यक्षां अनु पाटीलसह विविध पक्षातील अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला.
मीरा-भाईंदर शहारामध्ये माजी जिल्हाध्यक्ष संतोष पेंडुरकर यांना पदावरून काढून टाकल्यानंतर त्यांच्या ठिकाणी अंकुश मालुसरे यांची जिल्हाध्यक्ष पदावर नेमणूक करण्यात आली आहे. त्यानंतर ठाणे-पालघर जिल्हा समन्वयक आनंद परांजपे यांनी आता मोठ्या प्रमाणात संघटन बांधणीस सुरुवात केली असून या भागातील कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी आणि नवनवीन कार्यकर्त्यांना पक्षाशी जोडून घेण्याचे अभियान त्यांनी सुरु केले आहे.
मनसेच्या मीरा-भाईंदर महिलाध्यक्षा अनु पाटील, शिवसेनेचे राजू शहा, कल्पेश शहा; काँग्रेसच्या ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष गणेश लांबे, काँग्रेसच्या आदिवासी सेलचे प्रमोद कोल्हे; काँग्रेसचे शहर सचिव संजय सिंह, काँग्रेस ब्लॉक अध्यक्ष आनंद गुप्ता आणि सिनेक्षेत्रातील स्थळ दिग्दर्शक रोहित गुप्ता यांनी गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड आणि आनंद परांजपे यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीत प्रवेश केला.
यावेळी मीरा भाईंदरचे जिल्हाध्यक्ष अंकुश मालुसरे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या रोजगार विभागाचे सरचिटणीस डॉ. ओमकार माळी , प्रदेश प्रतिनिधि एडवोकेट विक्रम तारे पाटिल, सुरेश पंढरे, गुलाम नबी फारुकी आदि उपस्थित होते.
एकीकडे इतर पक्षातील अनेक कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जरी सामील होत असले तरी पक्षातंर्गत गटबाजी मात्र जोरात सुरु आहे. माजी जिल्हाध्यक्ष संतोष पेंडुरकर यांच्या समर्थकांचा एक गट अंकुश मालुसरे यांना जिल्हाध्यक्ष मानायलाच तयार नाहीत आणि त्यांनी जिल्हाध्यक्ष अंकुश मालुसरेच्या विरोधात जोरदार मोर्चा उघडला असून अगदी शरद पवार ते प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील पर्यंत तक्रारी केल्या आहेत. त्याच बरोबर सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि स्थानिक वर्तमान पत्रातून देखील त्यांच्या विरोधात दररोज काहींना काही लिहिले जात आहे.
अशा परिस्थितीत नवीन जिल्हाध्यक्ष अंकुश मालुसरे इतर पक्षातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात येणाऱ्या नविन कार्यकर्त्यांना कशा प्रकारे सामावून घेतील? आणि त्यांना पदं देताना कसा न्याय देऊ शकतील? यावरूनच त्यांच्या जिल्हाध्यक्ष पदाची खरी कसोटी ठरणार आहे.