Latest News आपलं शहर देश-विदेश महाराष्ट्र

राज्य शासनाने पत्रकारांना कोरोना योद्ध्याचा दर्जा द्यावा- केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्यात महाभयंकर कोरोना संसर्गाचा कहर वाढत असताना आपल्या जीवाची पर्वा न करता पत्रकार वृत्तांकन करून जनते पर्यंत महत्वाची माहिती पोहोचवीत असतात. लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या पत्रकारांना महाराष्ट्र शासनाने ‘कोविड फ्रंटलाईन वॉरियर्स’ कोरोना योद्ध्याचा दर्जा द्यावा अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून केली आहे.

पत्रकारांना ‘कोविड फ्रंटलाईन वॉरीयर्स’ अर्थात कोरोना योद्धा पदाचा दर्जा पंजाब, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, ओरिसा, बिहार या राज्यांनी दिला आहे. महाराष्ट्राला महनीय पत्रकारांची परंपरा लाभली आहे. ज्यांनी अखिल भारताचे नेतृत्व केले आहे. महाराष्ट्र राज्य नेहमी पत्रकारांचा सन्मान करणारे राज्य आहे. मात्र आता राज्यात महाविकास आघाडी सरकार ने पत्रकारांच्या बाबतीत उपेक्षेचे धोरण दिसत आहे. लॉकडाऊन च्या काळात अत्यावश्यक सेवेमध्ये ही पत्रकारांचा समावेश महाविकास आघाडी सरकार ने केलेला नाही. परिणामी पत्रकार आणि कॅमेरामन फोटोग्राफर यांना रेल्वे प्रवास करता येत नाही. अन्य राज्यांत पत्रकारांना कोरोना फ्रंटलाईन वारॉयर्स चा दर्जा दिला असताना महाराष्ट्रात पत्रकारांना रेल्वे प्रवासाची अत्यावश्यक सेवेत नोंद घेतली जात नाही. ही खेदजनक बाब आहे. पत्रकारांच्या मागण्यांची उपेक्षा महाविकास आघाडी सरकारने करू नये. राज्यातील पत्रकारांना कोरोना योध्याचा दर्जा देऊन त्यांचा सन्मान राखावा. महाराष्ट्रात कोरोनाच्या या बिकट काळात १२४ पत्रकारांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यांच्या कुटुंबियांना राज्य सरकार ने सांत्वनपर मदत केली पाहिजे. पत्रकारांना कोरोना योद्ध्याचा दर्जा देऊन त्यांना लसीकरणा मध्ये प्राधान्य द्यावे तसेच कोरोनामुळे पत्रकारांचा मृत्यू झाल्यास त्यांच्या परिवाराला सांत्वनपर ५० लाख रुपये मदत निधी द्यावा त्यासाठी ‘कोविड फ्रंटलाईन वॉरियर्स कोरोना योद्धा’ म्हणून पत्रकारांना दर्जा द्यावा अशी मागणी ना. रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कडे पत्र पाठवून केली आहे.

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *