संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
सात सप्टेंबर रोजी कन्याकुमारी येथून सुरू झालेली काँग्रेस पक्षाची ‘भारत जोडो’ यात्रा आज ६९८ किमी अंतर पार करून कर्नाटक मध्ये दाखल झाली. आज या यात्रेतील सहभागींसाठी उत्साहवर्धक दिवस होता. कारण काँग्रेसच्या हाय कमांड सोनिया गांधी या यात्रेत सहभागी झाल्या होत्या.
काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची ‘भारत जोडो यात्रा’ सध्या कर्नाटकात आहे. या यात्रेत आज सोनिया गांधी यांची एन्ट्री झाली आहे. मांड्या जिल्ह्यातील डाक बंगला परिसरातून सोनिया गांधी यांनी राहुल गांधी यांच्यासोबत पदयात्रेला सुरुवात केली आहे.
राहुल यांनी मोठ्या उत्साहात सोनिया गांधी यांचं स्वागत केलं. यात्रेत उपस्थित महिला नेत्यांनी सोनिया गांधींचा हात मिळवून अभिवादन केलं. सुमारे १५ मिनिटे चालल्यानंतर सोनिया गांधी आपल्या कारकडे परतल्या. मात्र काही काळ विश्रांती घेतल्यानंतर सोनिया गांधी पुन्हा पदयात्रेत सहभागी झाल्या.
अध्यक्षपदावरून पक्षात गदारोळ सुरू असताना सोनिया गांधी काँग्रेसच्या पदयात्रेत सहभागी झाल्या आहे. काँग्रेस अध्यक्षपदासाठी १७ ऑक्टोबरला निवडणूक होणार आहे. बऱ्याच दिवसांनी सोनिया गांधी त्यांच्या मातोश्री वारल्यानंतर एका सार्वजनिक कार्यक्रमात हजर झाल्या आहेत. प्रकृतीच्या कारणास्तव त्यांनी गेल्या काही निवडणुकांमध्ये प्रचारही केला नव्हता. ‘भारत जोडो यात्रा’ सुरू असताना सोनिया गांधी परदेशात उपचार घेत होत्या. सोनिया गांधी काही दिवसांपूर्वीच भारतात परतल्या आहेत.
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे सर्व नेते आणि कार्यकर्ते ‘भारत जोडो’ यात्रेअंतर्गत कन्याकुमारी ते जम्मू काश्मीर अशी पायी यात्रा सुरु केली आहे. राहुल गांधी सातत्याने विविध संघटनांचे लोकप्रतिनिधी आणि नागरिकांशी संवाद साधत आहेत.
भारत जोडो यात्रेची वैशिष्टे
‘* भारत जोडो यात्रा’ ३ हजार ५७० किलोमीटर लांब असणार आहे. ५ महिन्यांपर्यंत ही यात्रा चालणार आहे.
* ‘भारत जोडो’ यात्रेत सहभागी झालेले काँग्रेस नेते कंटेनरमध्येच झोपतात. अशा ६० कंटेनरची व्यवस्था करण्यात आली आहे. काही कंटेनरमध्ये बेड, टॉयलेट आणि एसी देखील आहेत.
* यात्रेतील सहभागी काँग्रेसचे नेते दररोज ६ ते ७ तास पायी चालतात आणि २२ ते २३ किलोमीटर अंतर कापतात.
* काँग्रेसचे ११९ नेते या यात्रेत सहभागी आहेत, यात २८ महिला आहेत.