संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत
दि.६ जून २०२१ रोजी ठाण्याच्या खारेगाव येथील ‘कार्तिकी विला’ येथे राहणाऱ्या सौ.रोशनी राऊत यांनी त्यांची ‘इको’ कार सकाळी ७ वाजता त्यांच्या राहत्या घरासमोर सार्वजनिक रोड वर पार्क करून ठेवलेली असताना अज्ञात चोरट्यांनी या कारचा सायलेन्सर चोरी केला. याबाबत त्याच दिवशी कळवा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंदवण्यात आला.
पोलिसांनी लगेचच घटनास्थळी आणि आजूबाजूच्या परिसरातील “सीसीटीव्ही फुटेज” चे रेकॉर्डींवरून संशयित इसमाची पडताळणी आणि खातरजमा केली.
खारेगाव ते कुर्ला, मुंबईकडे जाणाऱ्या सर्व मार्गांवरील “सीसीटीव्ही फुटेज” घेऊन पुन्हा पुन्हा पडताळणी करण्यात आली व हे आरोपी कुर्ला येथे वास्तव्यास असल्याचे समजले. याव्यतिरिक्त गुप्त बातमीदारांनी दिलेली माहिती आणि तांत्रिक माहिती मिळवून त्यांच्या नेमका ठावठिकाणा आणि इतर माहिती काढण्यात आली आणि त्यांच्यावर सापळा रचून –
१. शमशुद्दीन मोहोम्मदअदिस शहा (२१ वर्षे)
२. नदीम नवाब कुरेशी (२१ वर्षे)
३. शमशुद्दीन माजुद्दीन खान (२२ वर्षे)
४. सद्दाम मकाईस खान ( २६ वर्षे)
या सर्व आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबूली दिली. या आरोपींचे इतर २५ गुन्हे ही उघड झाले असून ठाणे, नवी मुंबई, पालघर, रायगड पुणे आणि गोवा राज्यातही त्यांनी असेच अनेक गुन्हे केलेले आहेत. त्यांच्याकडून कळवा पोलिसांनी ६,५०,०००/- रुपये किमतीचे २५ सायलेन्सर हस्तगत केले आहेत.