संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
पॉलिश करण्यासाठी दिलेले २०० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने घेऊन कारागीर पसार झाला होता. त्या कारागीराला कल्याणच्या बाजारपेठ पोलीसांनी दोन वर्षांनंतर अखेर अटक केली आहे. मिराजउद्दीन सीराजउद्दीन शेख (वय: ४२ वर्षे) असे त्याचे नाव असून तो मूळचा पश्चिम बंगाल राज्यामधील हुगळी जिल्ह्याच्या आरामबाग तालुक्यातील आमग्राम (पो. हरीनखोला) गावचा रहिवासी आहे.
बाजारपेठ पोलीसांनी प्रसिद्धी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, कल्याण पश्चिमेतील संतोषी माता मंदिर रोडवरील चिखलेबागेतील गणेश नगरमध्ये राहणारे मुबारक तोहीब शेख (वय: ४५ वर्षे) यांचा सोन्याचे दागिने घडविण्याचा व्यवसाय आहे. २४ ते २५ नोव्हेंबर २०१९ दरम्यान कारागीर मिराजउद्दीन सीराजउद्दीन शेख याच्याकडे मालक मुबारक शेख यांनी २०० ग्रॅम वजनाचे दागिने पॉलिश करण्यासाठी दिले होते. त्याची किंमत ६ लाख रुपये इतकी होती. मात्र, दागिने पॉलिश करून परत न करता हा कारागीर दागिन्यांसह पसार झाला.
पश्चिम बंगाल मधील मूळ गावातून आरोपी अटक..
मुबारक शेख यांनी अखेर ९ जानेवारी २०२० रोजी बाजारपेठ पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलिस निरीक्षक राजेंद्र अहिरे यांच्यासह सपोनि. सुजित मुंढे, भोसले, इंगळे, चव्हाण यांना हा कारागीर पश्चिम बंगालमध्ये त्याच्या मूळ गावी लपला असल्याची खबर मिळाली. सपोनि. सुजित मुंढे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मिराजउद्दीन शेख याला तो राहत असलेल्या आमग्राम (पो. हरीनखोला) या गावातून अटक केली.
आरोपीला पश्चिम बंगालमधून कल्याणला आणले..
त्यानंतर पोलीस कोठडीदरम्यान त्याने मालकाकडून लांबविलेल्या दागिन्यांपैकी उर्वरित सोने आई आजारी असल्याचे कारण सांगून पश्चिम बंगालमधल्या सोन्याच्या दुकानदारांना विकल्याचे कबूली दिली. मात्र, पोलीसांनी त्याच्याकडून १९८.३७० ग्रॅम वजनाचा ७ लाख ८९ हजार ४०० रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. आरोपीला कल्याण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीला पोलीस कोठडी सुनावली आहे.