Latest News आपलं शहर ताज्या महाराष्ट्र

‘इको सेन्सिटिव्ह’ झोनमध्ये शेकडो झाडांची कत्तल करून स्वतःचा ‘विहंग’ विकास करणार आमदार प्रताप सरनाईक?

मिरा भाईंदर: शिवसेनेचे आणि पर्यायाने पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे लाडके आमदार प्रताप सरनाईक येनकेन प्रकारेण कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमीच चर्चेत राहत असतात. अशाच प्रकारे आता देखील आमदार प्रताप सरनाईक पुन्हा चर्चेत आले आहेत मात्र यावेळेस चर्चा आहे ती त्यांच्या आलिशान बंगल्याच्या प्रकल्पासाठी शेकडो झाडांच्या कत्तलीची.

मिरा भाईंदर महानगर पालिका क्षेत्रातील मौजे चेने, सर्वे क्र. 97, 98 या भूखंडावर आमदार प्रताप सरनाईक यांचा आलिशान बंगल्याचा प्रकल्प उभा केला जाणार आहे. हा संपूर्ण परिसर ‘इको सेन्सिटिव्ह’ झोन अंतर्गत येत असून हा परिसर ना-विकास क्षेत्रा मध्ये देखील समाविष्ट आहे. असे असून देखील मिरा भाईंदर महानगर पालिका द्वारे या भूखंडावर आलिशान बंगल्याचा प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे.

आश्चर्याची बाब म्हणजे हा प्रकल्प मंजूर करण्यासाठी ज्या वादग्रस्त वास्तुविशारदाने बांधकाम परवानगीसाठी प्रस्ताव केला आहे तो ‘मे. अनिश असोशियेट्स’ हा राज्यात गाजलेल्या यूएलसी घोटाळा प्रकरणा सह अनेक प्रकल्पातील घोटाळ्याचा मुख्य आरोपी असून सद्ध्या तो जामिनावर सुटलेला आहे. ही सर्व माहिती असून सुद्धा आमदार प्रताप सरनाईक यांनी त्याला आपल्या ह्या बंगल्याच्या प्रकल्पासाठी वास्तू विशारद नेमला असल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आता त्यांनीच ह्या प्रकल्पात बाधा ठरणाऱ्या 96 झाडांच्या कत्तलीची परवानगी मागण्यासाठी अर्ज केला असून महानगर पालिकेच्या उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभागाने देखील तत्परता दाखवत शेकडो झांडाच्या कत्तलीसाठी हरकती सूचना मागविल्या असल्याचे उघड झाले आहे.

महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी देखील या नियमबाह्य प्रकल्पासाठी पायघड्या घातल्या असल्याचे दिसत असून या प्रकल्पासाठी उत्खननाची परवानगी देण्यात आली असून ‘इको सेन्सिटिव्ह’ झोन असलेल्या या परिसरात आज ही दिवस रात्र हजारो ब्रास बेकायदेशररित्या मातीचा भराव केला जात आहे.

या भूखंडावर 200 पेक्षा जास्त झाडे असून त्यापैकी अनेक झाडे आधीच छाटण्यात आल्याचे स्पष्ट झाले असून मिरा भाईंदर महानगर पालिकेच्या उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभागाने या वादग्रस्त प्रकल्पात आंबा, पिंपळ, करंज, जांभूळ सारखी महत्त्वाची 96 झाडे बाधित होत असल्याचे कारण सांगून ती तोडण्यासाठी नागरिकांच्या हरकती व सूचना मागिविल्या नंतर शेकडो नागरिकांनी लेखी व ईमेल द्वारे हरकती दाखल केल्या असून संबंधित सर्व विभागाकडे तक्रारी देखील दाखल केल्या आहेत.

भाजपचे कार्यकर्ते रणवीर बाजपेयी यांनी तर त्यांच्या संघटनेच्या माध्यमातून या झाडांच्या कत्तलीच्या विरोधात समाज माध्यातून एक जनजागृती मोहीम सुरू केली आहे तर पत्रकार आणि पर्यावरण प्रेमी राजेश सिंह यांनी या प्रकल्पाच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका देखील दाखल केली आहे.

आमदार प्रताप सरनाईक यांचा हा वादग्रस्त बंगल्याचा हा प्रकल्प यापूर्वी देखील चर्चेत राहिला असून आदिवासी नागरिकांसाठी मंजूर झालेला रस्ता आपल्या ह्या प्रकल्पाकडे वळविला असल्याचे उघड झाले होते त्यामुळे महापालिका आयुक्त, नगर रचना विभागातील अधिकारी आणि महसूल विभागातील अधिकारी हे सर्व आमदारांच्या या प्रकल्पास नियमाच्या चौकटीच्या बाहेर जाऊन सहकार्य करीत असल्याचे आरोप नागरिकांकडून केले जात आहेत.

मिरा भाईंदर महानगर पालिकेकडून एकीकडे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना माझी वसुंधरा अभियान राबविण्यात येत असून पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला जात आहे. या अभियानाच्या जाहिरातीवर आता पर्यंत कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च केला गेला आहे. तर दुर्दैवाने त्याच ठिकाणी महापालिका आयुक्त दिलीप ढोले यांच्या कार्यकाळात मात्र शहरातील हजारों झाडांची कत्तल केली जात आहे ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे महापालिका आयुक्त दिलीप ढोले यांची पर्यावरण रक्षणाचा भूमिका म्हणजे निव्वळ दिखावा असल्याचा आरोप शहरातील पर्यावरण प्रेमी नागरिकांनी केला आहे.

शिवसेनेचे पक्षप्रमुख, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे सुपुत्र राज्याचे पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना देशात पर्यावरण प्रेमी म्हणून ओळखले जाते. देवेंद्र फडणवीस यांची सत्ता असताना त्यांनीच हजारों झाडांची कत्तल रोखण्यासाठी आरेच्या जंगलात मेट्रो कारशेड उभरण्याला कडाडून विरोध करून महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर हा प्रकल्प इतर ठिकाणी स्थलांतरित करून आरेच्या जंगलाला ‘संरक्षित वन’ म्हणून घोषित केले आहे. मात्र आता त्यांच्याच पक्षाचे आमदार आपल्या खाजगी आलिशान बंगल्याच्या प्रकल्पासाठी ‘इको सेन्सिटिव्ह’ झोनमध्ये शेकडो झाडांची कत्तल करणार आहेत आता त्याला देखील विरोध करून हा प्रकल्प रद्द करण्याचे आदेश आपल्याच पक्षाच्या आमदारांना करतील का? आणि हा संपूर्ण परिसर ‘संरक्षित वन’ घोषित करतील का? असा सवाल सामान्य नागरिकांकडून केला जात आहे.

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *