“ग्रीन कॉरीडॉर मोहीम” राबवून रुग्णाचे प्राण वाचविणास मदत करणाऱ्या काशिमिरा वाहतूक शाखेच्या पोलिसांचा केला सत्कार!
मिरारोड, प्रतिनिधी : ग्रीन कॉरिडॉर मोहीम यशस्वीपणे राबवून फुप्फुसाच्या गंभीर आजाराच्या रुग्णाला रुग्णवाहिकेने अवघ्या 35 मिनिटांत मुंबईच्या पावनहंस विमानतळावर पोहचविण्यासाठी मदत करणाऱ्या काशिमिरा वाहतूक शाखेच्या पोलिसांचा मिरारोडच्या गोकुळ शांती वेल्फेअर असोसिएशन या संस्थेने सन्मान करून त्यांचे आभार मानले आहे.
याबाबत सविस्तर हकीकत अशी आहे की, मिरारोड पूर्वेकडील वॉकहार्ड हॉस्पीटल येथून एका गंभीर आजारी पेशंटला फुप्फुसाच्या उपचारासाठी पवनहंस विलेपार्ले विमानतळावरुन हैदराबाद येथे पुढील उपचारासाठी पाठवायचे होते. हॉस्पीटल प्रशासन तसेच पेशंटचे नातेवाईक यांनी रुग्णवाहिकेने विनाअडथळा पेशंट सुखरुप पाठविण्यासाठी वाहतूक पोलीस निरीक्षक रमेश भामे यांचेशी आज 2 एप्रिल रोजी सकाळी ०७.३५ वाजता फोनद्वारे संपर्क केला असता वाहतूक पोलीसांनी सदर रुग्णवाहिका योग्य त्या बंदोबस्तात पायलट वाहनाच्या मदतीने कोठेही ट्राफीक जॅममध्ये अडकणार नाही व रुग्णवाहिकेला पूर्ण रस्ता मोकळा मिळेल याची खबरदारी घेतली. पोलीसांनी ग्रीन कॉरीडॉर मोहीम राबवून अवघ्या 35 मिनीटांत मिरारोडच्या वोकहार्ड हॉस्पीटल पासून ते मुंबईच्या विलेपार्ले पवनहंस विमानतळ येथे अंबुलन्सने विनाअडथळा पेशंट सुखरुप पोहचविले.
ग्रीन कॉरीडॉर मोहीम, यशस्वी होण्यासाठी मुंबई वाहतूक नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून मिरारोड ते विलेपार्ले यादरम्यान वाहतूक बंदोबस्त लावून घेण्यात आला. त्यांनतर वाहतूक शाखेच्या पायलेटींग कार सोबत सकाळी ०९.१० वाजता ही रुग्णवाहिका वोकार्ड हॉस्पिटल मिरारोड येथून निघून ०९.१७ वाजता रुग्णवाहिकेने दहीसर टोलनाका पार केला व पवनहंस विलेपाले विमानतळावर ०९.४५ वाजता पेशंटला घेऊन सुखरुप पोहचली. वाहतूक पोलीसांनी वोकार्ड हॉस्पिटल, मिरारोड ते विमानतळ केवळ ३५ मिनीटात पेशंटला सुखरूप पोहचवले. पेशंट १०.०५ वा. एअर एम्बुलेन्सने रवाना होऊन ११.४० वाजता हैद्राबादला बागमपेठ विमानतळावर पोहचले.
मिरा भाईंदर शहरात प्रथमच ग्रीन कोरीडोर मोहीम यशस्वी पद्धतीने हाताळल्याबद्दल मीरा भाईंदर शहरातील अनेक मान्यवर नेते आणि नागरीकांनी मिरा-भाईंदर पोलिस आयुक्त सदानंद दाते, रेल्वे पोलिस आयुक्त रवींद्र सेनगावकर, डी.सी.पी मंजुनाथ, CSO जुहू एअरपोर्ट पवार, सांताक्रुजचे पोलिस निरीक्षक घानोरे या सर्वांचे आभार मानले तसेच सुर्यकांत गायकवाड, सहायक पोलीस आयुक्त (वाहतूक), रमेश भामे पोलीस निरीक्षक (वाहतूक) तसेच वाहतूक अंमलदार, वाहतूक शाखा मिरा-भाईंदर यांचे विशेष कौतुक केले आहे.
या प्रसंगाचे औचित्य साधून मिरारोड पूर्वेकडील गोकुळ व्हिलेज येथे असलेली गोकुळ शांती वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष संतोष बाणविलकर यांच्या संकल्पनेतून वाहतूक शाखेच्या पोलिसांचा सन्मान करण्याचे ठरवले. त्यानुसार शनिवारी 3 एप्रिल रोजी संस्थेच्या वतीने काशिमिरा येथील वाहतूक शाखेत जाऊन संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी वाहतूक शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भामे, सहायक पोलीस निरीक्षक माणिकराव कतुरे यांचेसह उपस्थित सर्व वाहतूक पोलिसांचा सत्कार करून त्यांचे विशेष आभार मानले. याप्रसंगी गोकुळ शांती वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष संतोष बाणविलकर सोबत संस्थेचे सचिव कवी खान, संस्थेचे सदस्य प्रवीण सालीयन आणि सॅमी इत्यादी उपस्थित होते.