संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत
२२ रुग्णालयांनी अतिरिक्त रक्कम रुग्णांना परत न केल्याचे झाले उघड
कोरोना बाधित रुग्णांकडून अतिरिक्त देयक वसूल केल्याची बाब लेखापरीक्षक विभागाच्या विशेष पथकाने केलेल्या तपासणीत उघड होताच महापालिकेच्या आरोग्य विभागाने संबंधित रुग्णालयांना नोटिसा बजावून रुग्णांना अतिरिक्त रक्कम परत करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतरही शहरातील २२ खासगी कोरोना रुग्णालयांनी रुग्णांना एकूण १ कोटी १४ लाख २८ हजार १२३ रुपयांची रक्कम परत केली नसल्याचे समोर आले आहे.
अशा रुग्णालयांना आरोग्य विभागाने पुन्हा नोटिसा बजावून कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. त्याचबरोबर रुग्णांना पैसे दिल्यानंतरच रुग्णालयांची नोंदणी नव्याने करण्यात येईल, असेही स्पष्ट केले आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत रुग्णांवर उपचार करण्यासाठी पालिका प्रशासनाकडे पुरेशी आरोग्य यंत्रणा नव्हती. रुग्णांना तात्काळ उपचार मिळावेत आणि त्यांचे प्राण वाचावेत या उद्देशातून महापालिका प्रशासनाने शहरातील काही खासगी रुग्णालयांना कोविड रुग्णालयाची मान्यता दिली होती. यापैकी काही रुग्णालयांकडून अवाजवी देयके आकारून रुग्णांची लूटमार केली जात असल्याच्या तक्रारी महापालिकेकडे प्राप्त झाल्या होत्या.
या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने लेखापरीक्षक विभागाचे विशेष पथक नेमले होते. या पथकामार्फत रुग्णांकडून वसूल करण्यात आलेल्या सर्वच देयकांची चौकशी सुरू करण्यात आली होती. त्यामध्ये रुग्णांकडून जास्तीची रक्कम वसूल करण्यात आल्याचे समोर आले. या सर्वच रुग्णालयांना नोटिसा बजावून स्पष्टीकरण देण्याचे आदेश आयुक्त डॉ.विपिन शर्मा यांनी दिले होते.