संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
राज्यात ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळात फेरबदलाची शक्यता वर्तवण्यात येत असून, विशेषतः काँग्रेसच्या काही मंत्र्यांच्या खात्यात अदलाबदल होण्याचे संकेत पुन्हा एकदा दिले जात आहे. त्यातच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे दिल्लीला गेल्याने राजस्थानप्रमाणे राज्यातही काँग्रेस बदल घडविण्याच्या विचारात असल्याचे सांगण्यात आले. तेव्हाच पुढील महिन्यात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात विधानसभा अध्यक्षही निवडला जाणार असल्याने त्याच्या नावावरही काँग्रेसकडून शिक्कामोर्तब होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
विधानसभा अध्यक्षपदाचा नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यापासून काँग्रेसच्या मंत्र्यांची खाते बदलले जाण्याची चर्चा आहे. एका कॅबिनेट मंत्र्याचा राजीनामा घेऊन, त्याजागी पटोले यांना आणि पश्चिम महाराष्ट्रातील एका आमदाराला राज्यमंत्रीपद दिले जाण्याचे बोलले गेले. त्यावरून मंत्र्यात नाराजीही दिसून आल्याने पक्षश्रेष्ठी बदलापासून लांब राहिली. मात्र, पंजाब आणि आता राजस्थानातील बदलानंतर महाराष्ट्रातही तसे घडू शकते, या चर्चा सुरू आहे. त्यात पटोले हे मंगळवारी सकाळीच दिल्लीला रवाना झाल्याने पक्षात नव्या घडामोडी होण्याची शक्यता नाकारता येणार नसल्याचेही सांगण्यात येत आहे.
याचदरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेनेचे संजय राऊत यांच्यातही भेट घडल्यानेही ठाकरे सरकारमध्ये नव्याने काही बदल होऊ शकतात काय? याची चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात होती. मात्र, अन्य काही महत्त्वाच्या विषयांवर पवार यांच्यासोबत चर्चा केल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले.
अध्यक्षाच्या नावावर चर्चाविधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होण्याची शक्यता असून, या अधिवेशनात विधानसभा अध्यक्ष हमखास निवडला जाणार असल्याचे पटोले यांनी गेल्या महिन्यात स्पष्ट केले होते. कोरोनाची साथही ओसरल्याने या पदासाठी निवडणूक घेण्यास मुख्यमंत्री आणि ठाकरे सरकारमधील प्रमुख नेते राजी आहेत. त्यामुळे पटोले यांच्या दिल्ली दौऱ्यात विधानसभा अध्यक्षाच्या नावावर चर्चा होऊ शकते.