संपादक: मोईन सय्यद/भाईंदर, प्रतिनिधी
भाईंदर: तब्बल वीस वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आणि सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अखेर भाईंदर पश्चिमेकडील उत्तन चौक येथे जंजिरे धारावी किल्ले येथे चिमाची आप्पा यांचे स्मारक उभारले जाणार असून त्याकरिता त्यांचा अश्वारुढ पुतळा शहरात मागविण्यात आला असून 18 ऑगस्ट चिमाजी आप्पा यांच्या जन्म शताब्दी दिनाचा मुहूर्त साधून हा पुतळा धारावी किल्ल्याच्या स्मारकावर बसविण्यात आला असून किल्ल्याच्या परिसरातील सर्व विकास कार्य पूर्ण झाल्यानंतर या पुतळ्याचे उद्घाटन करण्यात येणार आहे.
शूरवीर चिमाजी आप्पांचा थोडक्यात इतिहास:
अनंत बाळाजी भट तथा चिमाजी आप्पा ऊर्फ चिमणाजी आप्पा हे पेशवा बाळाजी विश्वनाथ भट यांचे पुत्र व बाजीराव पेशव्यांचे धाकटे भाऊ होते.
बाजीरावांना पेशवाई मिळाल्यानंतर चिमाजी आप्पा यांना सरदारकी मिळाली. काही वर्षे त्यांनी अंबाजी त्रिंबक पुरंदरे यांच्यासह सातार्यास पेशव्यांचा वकील म्हणून काम केले. तसेच काही वेळा त्यांना मोहिमांवर जावे लागे. त्यांनी केलेल्या पहिल्या मोठ्या मोहिमेत आमझरे येथे झालेल्या लढाईत त्या वेळचा माळव्याचा मोगल सुभेदार गिरिधर बहादुर व त्याचा नातेवाईक दया बहादुर यांना ठार करून सबंध माळवा आपल्या ताब्यात आणला (१७२८) आणि तो शिंदे, होळकर व पवार या तीन सरदारांत वाटूनही टाकला.
त्यानंतर १७२९ मध्ये पावसाळा संपल्यानंतर गुजरात प्रांतात चौथाई वसूल करण्यासाठी म्हणून चिमाजी आप्पा यांची स्वारी झाली. चिमाजी आप्पांच्या पराक्रमामुळे तेथील मोगल सरदार सरबुलंदखानाने शरणागती पतकरून मराठ्यांच्या चौथाई व सरदेशमुखीचे हक्क कबूल केले. त्यानंतर त्यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या आदेशानुसार कोकणात मराठी राज्यास त्रास देणार्या जंजिरेकर सिद्दी सात याचा बंदोबस्त करण्यासाठी कोकणात स्वारी केली (१७३६). या स्वारीत सिद्दी सात यास ठार केले व कोकणात कायमचा वचक बसविला.
यावेळी बाजीराव उत्तरेत होते. ते परत येत असता निजामाने भोपाळजवळ त्यांस अडविण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी चिमाजी आप्पांनी निजामाला दक्षिणेतून येणारी मदत बंद करून जेरीस आणले, तेव्हा तो बाजीरावांस शरण आला.
चिमाजी आप्पा यांच्या आयुष्यातील सर्वांत महत्त्वाची कामगिरी म्हणजे पोर्तुगीज सत्तेविरुद्धची मोहीम आणि वसई हस्तगत करणे, ही होय (१७३७-३९). वसई प्रांतातील पोर्तुगीजांच्या धार्मिक छळाला कंटाळून तेथील जनतेने पेशव्यांकडे रक्षण करण्याची विनंती केली.
बाजीराव पेशव्यांनी चिमाजी आप्पांना या मोहिमेवर पाठवले. या मोहिमेत मराठ्यांनी सुरुवातीला ठाणे, घोडबंदर, मनोर, पारसिक, अर्नाळा इत्यादी ठाणी जिंकून घेत पोर्तुगीजांना शह दिला. या मोहिमेची जबाबदारी प्रामुख्याने अणजूरकर बंधूंवर होती. काही दिवसांनी चिमाजी आप्पा यांना भोपाळच्या लढाईत निजामाविरुद्ध जावे लागले होते, त्यामुळे वसईची मोहीम अर्धवट राहिली. पुढे पावसाळा संपल्यानंतर नोव्हेंबर १७३७ मध्ये पुन्हा एकदा युद्ध सुरू झाले.
माहीमचे ठाणे घेतल्यानंतर चिमाजी आप्पा पुन्हा एकदा आपल्या फौजेसह वसई प्रांतात दाखल झाले. काही दिवस मुक्काम केल्यानंतर चिमाजी पुण्यास परतले. त्यानंतर १७३८ चा पावसाळा संपल्यानंतर जेव्हा थोरले बाजीराव पुण्यात आले, तेव्हा पुन्हा एकदा वसईवर हल्ला करण्याचे ठरवले. यानंतर प्रचंड फौज घेऊन चिमाजी आप्पा हे वसई प्रांतात उतरले.
यावेळी त्यांच्यासोबत मल्हारराव होळकर वगैरे सरदार सामील झाले होते. डिसेंबर महिन्यात पोर्तुगीजांचा सेनापती पिड्रो ड मेल हा मारला गेला. यानंतर मराठ्यांनी तारापूरचे ठाणे जिंकून घेतले (१७३९). मराठ्यांनी बाजी रेठेकरसारखा योद्धा गमावला. यानंतर केवळ वसईचे ठाणे घ्यायचे बाकी राहिले होते. ते काही हातात येईना, त्यामुळे चिमाजी आप्पा यांनी सर्व सरदारांना एकत्र बोलावले व सांगितले की, “वसई ताब्यात येत नाही, माझा हेतू वसई घ्यावी असा आहे, तरी तोफ डागून माझे मेलेले शरीर तरी वसई किल्ल्यात पडेल असे करा.” हे वीरश्रीयुक्त बोलणे सर्व सरदारांनी ऐकले आणि वसईवर निकराचा लढा केला. अटीतटीचा संघर्षानंतर शेवटी चिमाजी आप्पांनी वसई जिंकली व पोर्तुगीजांचे तेथील बस्तान पार उखडून टाकले.
मराठ्यांना पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेला ३४० गावांचा प्रदेश, २० किल्ले, २५ लाखांचा दारूगोळा वगैरे साहित्य मिळाले. तितक्यात बाजीराव वारल्याची खबर चिमाजी आप्पांना मिळाली, त्यामुळे ते लगेच पुण्यात परतले. पुढे सातारा येथे छत्रपती शाहू महाराजांच्या करवी बाजीरावांचा थोरला मुलगा बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब (१७४०-६१) यांस मुख्य प्रधानपद मिळाले, तसेच वसई येथे केलेल्या पराक्रमामुळे चिमाजी आप्पा यांचा सन्मान करण्यात आला.
पुढे चिमाजी आप्पांनी यांनी दीव दमण प्रांतावर हल्ला करून तेथील उरलेल्या पोर्तुगीज सत्तेचा पराभव केला (१७४०). त्यामुळे पोर्तुगीज फक्त गोव्यापुरतेच मर्यादित राहिले. त्यानंतर नानासाहेब पेशवे यांना घेऊन चिमाजी आप्पा उत्तरेच्या स्वारीवर निघाले. चिमाजी आप्पांना क्षयाचा त्रास होता, त्यात या सर्व दगदगीमुळे त्यांची तब्येत अतिशय बिघडून १७ डिसेंबर १७४० रोजी एदलाबाद येथे त्यांचे निधन झाले. पुण्यातील ओंकारेश्वर मंदिरात त्यांची समाधी आहे.
चिमाजी आप्पा हे काही बाबतींत थोरल्या बाजीराव पेशव्यांपेक्षा श्रेष्ठ तसेच शूर, धोरणी व मनमिळाऊ होते. बाजीरावांच्या अनुपस्थितीत घर आणि खासगी कारभार त्यांनी अत्यंत कौशल्याने सांभाळले. वसईच्या किल्ल्यात सापडलेल्या एका फिरंग्याच्या मुलीला त्यांनी सन्मानाने पाठविल्याची हकिकत प्रसिद्ध आहे.
तब्बल वीस वर्षांनी दुर्गप्रेमींच्या प्रयत्नाला आले यश!
चिमाजी आप्पा यांनी भाईंदर पश्चिमेकडील चौक गावाच्या समुद्रकिनारी जंजिरे धारावी किल्ला, बुरुज व तटबंदी बांधली होती. परंतु स्वातंत्र्योत्तर काळात त्याकडे भारतीय पुरातत्व खात्याचे दुर्लक्ष झाले होते.
मीरा भाईंदर नगरपालिका असताना तत्कालीन नगराध्यक्ष गिल्बर्ट मेंडोंसा असताना नियोजन समितीचे सभापती लिओ कोलासो यांनी चिमाजी आप्पा यांच्या स्मारकासाठी विकास आराखड्यात 0.70 हेक्टर जागा आरक्षित करून 25 लाख रुपयांची तरतूद केली होती.
त्याच वेळी समाजसेवक व दुर्ग प्रेमी रोहित सुवर्णा यांनी देखील शूरवीर चिमाजी आप्पा यांच्या स्मारकाच्या उभारणी साठी प्रयत्न सुरू केले होते आणि गेल्या वीस वर्षांपासून सतत पाठपुरावा करीत असून या किल्ल्याच्या संरक्षण आणि संवर्धन करणेकरिता पाठपुरावा केला होता. चिमाजी आप्पा यांचा पुतळा बसविण्याची सर्वप्रथम मागणी त्यांनीच केली होती. परंतु येथील काही विरोधकांनी नगरपालिका, पुरातत्व खाते आणि प्रशासनाकडे त्याच्या विरोधात तक्रारी केल्यानंतर या किल्ल्याचा विकास रखडला होता. त्यानंतर मात्र माजी नगरसेवक जॉजी गोविंद आणि नगरसेविका हेलन जॉजी गोविंद यांनी या स्मारकाच्या विकासासाठी महानगरपालिकेकडे सतत पाठपुरावा केला.
मध्यंतरी भाईंदरच्या युवा प्रतिष्ठानचे कार्यकर्ते गणेश बामणे, श्रेयस सावंत, महेश चव्हाण या दुर्गप्रेमी युवकांनी जंजिरे धारावी किल्ल्याची साफसफाई केली होती. त्यावेळी पुन्हा या किल्ल्याच्या परिसराच्या विकासाची मागणी जोर धरू लागली होती.
अखेर शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांनी प्रयत्न करून जिल्हाधिकाऱ्याची परवानगी मिळवून दिली आणि चिमाजी अप्पाच्या स्मारकाच्या निर्मिती चा मार्ग मोकळा झाला असून 17 ऑगस्ट रोजी चिमाजी आप्पा यांचा पुतळा मागविण्यात आला आणि आज 18 ऑगस्ट त्यांच्या जन्म शताब्दी रोजी हा अश्वारूढ पुतळा स्थानापन्न करण्यात आला.
याप्रसंगी स्थानिक नगरसेविका हेलन जोजी गोविंद, शर्मिला अजित गंडोळी, माजी नगरसेवक जोजी गोविंद, पोलीस पाटील विलियम गोविंद, माजी नगरसेवक व दुर्गप्रेमी रोहित सुवर्णा, एलयास बांड्या, पत्रकार मयूर ठाकूर इत्यादी उपस्थित होते. स्मारकाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर आणि परिसरातील सर्व सुशोभीकरणाचे कार्य पूर्ण झाल्यानंतर या पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे.
मीरा भाईंदर शहराला एक गौरवशाली असा ऐतिहासिक वारसा लाभला असून या ऐतिहासिक वारशाचे मुख्य शिलेदार शूरवीर चिमाजी अप्पा यांच्या स्मारक उभारला जाणार असल्यामुळे इतिहास प्रेमी आणि दुर्गप्रेमी यांनी समाधान व्यक्त केले आहे.