संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत घरकाम करणाऱ्या कामगारांना प्रत्येकी १५०० रुपये देण्याची घोषणा राज्य सरकार तर्फे करण्यात आली असून त्यासाठी रक्कमही मंजूर करण्यात आली आहे. मात्र ही रक्कम केवळ ‘महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळा’त नोंदणी असलेल्या महिलांना मिळणार असल्याने उर्वरित लाखोजणी या लाभापासून वंचित राहणार आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे घरकामगारांना अनेक घरांनी कामावरून काढून टाकले. सध्या रेल्वे प्रवासावरील निर्बंधांमुळेही महिलांना घरकामासाठी जाणे अवघड झाले आहे.
गेल्यावर्षभरापासून अनेक घरकामगार महिलांचा रोजगार बुडाला आहे. सध्या याच महिलांना सरकारची १५०० रुपयांची मदत मिळणार आहे असे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे.
मात्र, ही मदत घरेलू कामगार मंडळाकडे नोंदणी झालेल्या महिलांनाच मिळणार आहे. घरेलू ‘कामगार कल्याण मंडळ’ घरकामगारांसाठी विविध योजना राबवत असते. मात्र गेल्या काही वर्षात हे मंडळ निष्क्रीय झाले आहे व अनेक योजना बंद झाल्या आहेत. त्यामुळे सुरवातीच्या काळात नोंदणी केलेल्या अनेक महिलांनी मागील काही वर्षात नोंदणीचे नुतनीकरण केलेले नाही. तसेच घरकामगारांसाठी असे काही मंडळ आहे, याचीही अनेकजणींना माहितीच नाही.
त्यातून सद्यस्थितीत घरकामगार मंडळाकडे नोंदणीकृत आणि या नोंदणींचे नुतनीकरण झाले अशा केवळ १ लाख ५ हजार महिला आहेत. ‘मंडळाकडे सुमारे १ लाख घरेलू कामगार महिलांची माहिती उपलब्ध आहे. त्यांना मदत निधी पोहचविण्याची तयारी सुरू आहे, असे विकास आयुक्त (असंघटीत कामगार) पंकज कुमार यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले.
नोंदणीपेक्षा घरकामगारांची संख्या मोठी..
मुंबई आणि परिसरातील सुमारे ५ लाख घरकामगार महिला काम करतात. मंडळाने या घरेलू कामगारांच्या नोंदणीसाठी प्रामुख्याने कधी पुढाकार घेतला नाही असा आरोप घरकाम करणाऱ्या महिलांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना केला आहे .