संपादक: मोईन सय्यद / मिरा भाईंदर, प्रतिनिधी
एकीकडे कोविडच्या रुग्णांना चागल्या सोयी सुविधा देखील पुरविल्या जात नसताना आणि रुग्णांना वेळेवर जेवण-पाणी देखील दिले जात नसताना मिरा भाईंदर महानगरपालिका आता कोविड सेंटरच्या दिवसाची सुरूवात भुपाळीने होणार असून यासोबत सकाळ संध्याकाळ कोविड सेंटरमध्ये रुगणांच्या मनोरंजनासाठी मोहम्मद रफ़ी, मुकेश, किशोर कुमारची गाणी देखील वाजविले आहेत. अशा प्रकारे कोविड सेंटर मधील उपचारार्थ दाखल असलेल्या कोविड रुग्णांमध्ये सकारात्मक उर्जा निर्माण करण्याचा प्रयत्न महानगरपालिका करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. शहरातील सर्व कोविड सेंटर मधील वातावरण प्रसन्न आणि सकारात्मक रहावे यासाठीच महानगरपालिकेने हा उपक्रम हाती घेतल्याची माहिती आयुक्त श्री. दिलीप ढोले यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
मिरा भाईंदर महापालिकेचे स्व. प्रमोद महाजन सभागृह, पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी हॉल, स्व. मिनाताई ठाकरे हॉल, भारतरत्न पं. भिमसेन जोशी रुग्णालय, समृद्धी कोविड केअर सेंटर, कॉरन्टाईन सेंटर R1 व R2 (गोल्डन नेस्ट) व डेल्टा गार्डन या ठिकाणी शहरातील कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. महानगरपालिकेची सर्व प्रशासकीय यंत्रणेबरोबरच कोविड सेंटर मधील सर्व डॉक्टर, नर्सेस तसेच इतर कर्मचारी वर्ग रुग्णांची काळजी घेत आहे. मात्र या कोविड सेंटर मधील वातावरण आणखी प्रफ़ुल्लीत आणि प्रसन्न रहावे आणि रुग्णांमध्येही सकारात्मक भावना निर्माण व्हावी यासाठी काही दिवसातच या सर्व कोविड सेंटर मध्ये ध्वनी यंत्रणा लावण्यात येणार आहे. या ध्वनी यंत्रणेमधून सर्व कोविड सेंटरची सुरूवात भुपाळीने होणार आहे. त्यानंतर मोहम्मद रफ़ी, मुकेश, किशोरकुमार, लता मंगेशकर, आशा भोसले या जुन्या काळातील गायकांबरोबरच नव्या काळातील गायकांचे गाणे सुध्दा यासर्व कोविड सेंटरमध्ये वाजले जाणार आहे.
सर्व रुग्ण उपचारांना प्रतिसाद देतातच पण काही रुग्णांच्या मनात कोविड बाबत भिती निर्माण झालेली असते. त्यामुळेच या उपक्रमाची सुरुवात करत असून संगीतासारखे दुसरे औषध नाही त्यामुळे हा अनोखा उपक्रम सुरू करीत असल्याची माहिती आयुक्त श्री. दिलीप ढोले यांनी दिली. त्याचप्रमाणे सर्व कोविड सेंटरमध्ये रुग्णांसाठी समुपदेशन आणि योगा क्लासेस सुध्दा सुरू करीत असल्याचे आयुक्त श्री. दिलीप ढोले यांनी स्पष्ट केले. असे असले तरी कोविड सेंटर मधील रुग्णांना वेळेवर औषधे दिली जात नाहीत, त्यांना वेळेवर जेवण-पाणी देखील मिळत नाही, चार चार तास गरज असलेल्या रुग्णांना पाहायला नर्सेस देखील जागेवर नसतात, मृत झालेल्या रुग्णाला तासनतास इतर रुग्णां सोबत तसेच ठेवले जाते अशा अनेक तक्रारी येथे उपचारासाठी दाखल असलेल्या नागरिकांनी केल्या आहेत. आणि आता तर कोविड सेंटर मध्ये रुगणांचे नातेवाईक,मित्रमंडळी, इतर नागरिक आणि पत्रकार यांना प्रवेशबंदी असल्याचे फलक मुख्य प्रवेशद्वारावर लावले असून कोविड सेंटर मध्ये सर्व काही आलबेल आहे असे वाटत नाही आणि म्हणून महापालिका प्रशासन काहीतरी लपविण्यासाठी हा उपद्व्याप करीत असल्याचे बोलले जात आहे.
जे रुग्ण या कोविड सेंटर मधून बरे होऊन घरी आले त्यांनी आपले अनुभव सांगताना बोलले की कोविड सेंटर मध्ये फारच भयानक परिस्थिती आहे. नातेवाईकांना आतील माहिती सुद्धा दिली जात नाही अशी परिस्थिती असताना बाहेर मात्र सर्व काही खूप चागले आहे सर्व रुग्णांना खूप चांगल्या सुविधा पुरविल्या जात आहेत असे महानगरपालिके कडून भासवले जात आहे. महापालिका प्रशासनाने इतर वायफळ गोष्टी वर वेळ आणि पैसा वाया न घालवता रुग्णांच्या चागल्या सुविधा आणि उपचार यांचेवर अधिक लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.