संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना दुसरीकडे वेदान्त-फॉक्सकॉन प्रकल्प राज्याबाहेर गेल्यावरूनही सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा थेट सामना पाहायला मिळत आहे. दोन्ही बाजू यासाठी एकमेकांना जबाबदार धरत असून वेगवेगळे पुरावे सादर करत आहेत. आत्तापर्यंत विरोधकांकडून १५ जुलै रोजी राज्य सरकारच्या झालेल्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीचा संदर्भ देत याचं खापर सत्ताधाऱ्यांवर फोडलं जात होतं. आता सत्ताधाऱ्यांकडून एक पत्र व्हायरल केलं जात असून त्याचा हवाला देऊन आधीच्या ठाकरे सरकारमुळेच प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्याचा दावा केला जात आहे. यासंदर्भात बोलताना कॅबिनेट मंत्री उदय सामंत यांनी नाव न घेता आदित्य ठाकरेंवर टीकास्र सोडलं आहे.
भाजपा आमदार राम कदम यांनी सोमवारी एक ट्वीट केलं होतं. या ट्वीटसोबत त्यांनी त्यांच्या पत्राला महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने उत्तरादाखल दिलेल्या पत्राचा फोटो शेअर केला आहे. या पत्रामध्ये ‘वेदान्त फॉक्सकॉन कंपनीसोबत महाराष्ट्र शासनाचा आत्तापर्यंत कोणताही ‘एमओयू’ झालेला नाही. वेदान्त फॉक्सकॉन कंपनीला महामंडळाकडून जागेचे वाटप झालेले नाही. त्यामुळे सर्व्हे क्रमांक किंवा ऍग्रीमेंट याबाबत माहिती देता येत नाही’, असं चक्क नमूद करण्यात आलं आहे.
यासंदर्भात टीका करताना भाजपा आमदार आणि मुंबई अध्यक्ष ऍड.आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरेंना लक्ष्य केलं आहे. ‘या प्रकरणी खोटे बोलून मराठी तरुणांची माथी भडकवण्याचा प्रयत्न करणाऱ्या आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी ! चौकशीला समोरे जा. अजून बरेच काही निघेल! अन्यथा तरुणांची माथी भडकवणे, दोन समाजात तेढ निर्माण करणे या प्रकरणी कायदेशीर कारवाई सरकारने का करु नये ?’ असा सवाल थेट आशिष शेलार यांनी ट्वीटच्या माध्यमातून विचारला गेला आहे.
दरम्यान, या सर्व प्रकरणावर प्रसारमाध्यमांशी बोलताना उदय सामंत यांनी आदित्य ठाकरेंचं नाव न घेता त्यांच्यावर तोंडसुख घेतलं आहे. “भाजपा आमदार राम कदम यांनी केलेलं ट्वीट सगळ्यांसाठी महत्त्वाचं आहे. महाराष्ट्रात फिरून सगळ्यांच्या नावाने आगपाखड केली जात आहे. एमओयू झाल्याचं सांगितलं जात होतं. दोनच सह्या शिल्लक आहेत असं सांगितलं जात होतं. पण आता आमच्या विभागानं दिलेल्या पत्रामध्ये स्पष्ट म्हटलं आहे की वेदान्त फॉक्सकॉनला कोणतीही जमीन दिली गेली नव्हती. कोणताही एमओयू झालेला नव्हता. त्यामुळे काही वाईट झालं तर शिंदे-फडणवीस सरकारमुळे झालं हे सांगण्याची विरोधकांची पद्धत या सगळ्या प्रकारातून आपल्याला पाहायला मिळत आहे”, असं उदय सामंत म्हणाले.
यावेळी उदय सामंत यांनी शिवसेनेकडून थापा एकनाथ शिंदे गटासोबत आल्यावरून केल्या जात असलेल्या टीकेचा समाचार घेतला. “खालच्या स्तरावरची टीका कशी होते, याचं प्रात्याक्षिक महाराष्ट्राला रोज पाहायला मिळत आहे. थापा शिंदेंसोबत का आले, हे तेच सांगू शकतील. कालपर्यंत आम्ही खोके घेतले होते, कालपासून थापाने खोके घेतले. आता उद्या अजून कुणी प्रवेश केला तर अजून कुणी खोके घेतले. खोक्याच्या पलीकडे काही शिल्लकच राहिलेलं नाही”, असं उदय सामंत म्हणाले. “एखादा विषय राजकीयदृष्ट्या कितपत पुढे न्यायचा, त्यातलं तथ्य लोकांसमोर ठेवायचं हे समजून घेण्यापेक्षा लोकांमध्ये गैरसमज निर्माण करून एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतच्या आमदारांना बदनाम करायचं यासाठी काम सुरू आहे”, असं सामंत म्हणाले.
“संतोष बांगर यांच्या गाडीवर हल्ला झाला. प्रत्येकाच्या मनगटात ताकद असते. पण आम्ही बाळासाहेब ठाकरेंचा विचार पुढे नेत असताना संस्कार पाळतो. वारंवार मारामाऱ्या करणं, गाड्यांवर हल्ला करणं यात फार मोठा पुरुषार्थ आहे असं मला वाटत नाही”, अशा शब्दांत उदय सामंत यांनी शिवसेनेला सणसणीत टोला लगावला.