संपादक: मोईन सय्यद/मिरा भाईंदर प्रतिनिधी
मिरा भाईंदर : महाराष्ट्रातील एका प्रसिद्ध दैनिक वर्तमानपत्राचे मिरा भाईंदर प्रतिनिधी भाविक पाटील यांना भाजपच्या नगरसेविका अनिता पाटील यांच्या भावाकडून जीवघेणा हल्ला करून मारहाण व शिवीगाळ करण्यात आली आहे. या प्रकरणी काशिमिरा पोलिस ठाण्यात पत्रकार संरक्षण कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रकरणाचा तपास सहायक पोलीस आयुक्त विलास सानप करीत आहेत.
पत्रकार भाविक पाटीलवरवर झालेल्या हल्ल्याचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे आहे की, महाराष्ट्रातील एका नामवंत दैनिकचे मिरा भाईंदर प्रतिनिधी भाविक पाटील शनिवारी दुपारी साडे बाराच्या सुमारास वृत्तसंकलन करण्यासाठी पेणकर पाडा परिसरातून जात असताना पेणकर पाडा परिसरातील भाजपच्या नगरसेविका अनिता पाटील यांचे भाऊ राजेश चौहान चारचाकी वाहन घेऊन भरधाव वेगाने जात होते.
त्याच वेळी त्याच्या मागून पत्रकार भाविक पाटील हे देखील मोटारसायकल वरून जात होते. पत्रकार भाविक पाटील यांना गाडी मागे घे अश्या उर्मट भाषेत राजेश चौहान यांनी दम द्यायला सुरुवात केली त्यांचा राग अनावर झाला आणि गाडीतून उतरून पत्रकार भाविक पाटील यांना शिवीगाळ व मारहाण करण्यात आली यावेळी पत्रकार भाविक पाटील यांनी थांबण्याचा प्रयत्न केला असता जीवे ठार मारण्याची धमकी दिली.
या संदर्भात शहरातील सर्व पत्रकार यांनी काशिमिरा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे यांची भेट घेतली व संबंधित मारहाण करणारा मुजोर राजेश चौहान यांच्या पत्रकार संरक्षण कायदा, धमकी, शिवीगाळ केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्याची मागणी करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार संबंधित आरोपीवर याअगोदर देखील जमीन बळकावणे, अनधिकृत बांधकाम करणे आणि मारहाणीचे अनेक गुन्हे दाखल असून नगरसेविका अनिता पाटील ह्या आपल्या भूमाफिया भावाच्या मदतीने पेणकर पाडा परिसरात अनेक अनधिकृत बांधकामे करीत असल्याचे सांगितले जात आहे. पत्रकार भाविक पाटील यांच्यावर झालेला हल्ला जाणीवपूर्वक केला असून अश्या मुजोर आणि सत्तेचा माज असलेल्या व्यक्तींवर पोलिसांनी कठोर कारवाई केली पाहिजे अशी मागणी शहरातील सर्व पत्रकारांनी केली आहे.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस आयुक्त विलास सानप स्वतः करीत असून आरोपी राजेश चौहान याला अटक करण्यात आली असल्याचे सांगितले आहे.