संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या भाजपमध्ये पुनरागमनाची पुन्हा एकदा चर्चा रंगू लागली आहे. एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या कानात ‘एकदा भेटून मिटवून टाकू’ म्हटल्याचा खुलासा भाजप नेते गिरीश महाजन यांनी केला आहे.
राष्ट्रवादीत दाखल झालेले एकनाथ खडसे यांच्या घरवापसीची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. आता नाशिकमध्ये एकनाथ खडसे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांची भेट घेतली. या भेटीबाबत गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्याबाबत गौप्यस्फोट केला.
एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस आणि माझी नाशिक येथे एका कार्यक्रमात भेट घेतली. यावेळी त्यांनी फडणवीसांच्या कानात ‘एकदा भेटून मिटवून टाकू’ असा खुलासा महाजनांनी केला आहे. महाजनांच्या या खुलासानंतर खडसेंना नेमका काय तोडगा काढायचा ? खडसे भाजपमध्ये जाण्याच्या विचारात आहेत का ? अशा अनेक चर्चांना आता उधाण आले आहे.
काही दिवसांपूर्वी भाजप खासदार रक्षा खडसे यांच्यासह एकनाथ खडसे दिल्लीत अमित शहांना भेटायला गेले होते. मात्र, अमित शहा यांच्या व्यस्त कार्यक्रमामुळे ही बैठक होऊ शकली नाही. मात्र, खडसे यांची अमित शहा यांच्याशी फोनवरून चर्चा झाल्याची माहिती खुद्द रक्षा खडसे यांनी दिली होती. त्यामुळे एकनाथ खडसे यांच्या भेटीमुळे घरवापसीची चर्चा जोरात रंगली आहे.