संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांचे महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे यांची, तर उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. विधानसभेत दि. ४ रोजी भाजप व शिंदे गटानं बहुमतानं विश्वासदर्शक ठराव जिंकला. त्यामुळे आता खऱ्या अर्थ्याने महाराष्ट्रात शिंदे सरकार आले आहे..
विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाषण झाले. त्यात त्यांनी पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा देणार असल्याचा मोठा निर्णय जाहीर केला.
व्हॅटमध्ये कपात करणार..
महाराष्ट्र सरकार लवकरच पेट्रोल-डिझेलवरील ‘व्हॅट’मध्ये कपात करणार आहे. लवकरच यासंदर्भात मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात येईल. महाराष्ट्रातील नागरिकांना स्वस्त दरात पेट्रोल-डिझेल देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
मोदी सरकारने गेल्या दिवाळीत पेट्रोल-डिझेल वरील अबकारी करात मोठ्या प्रमाणात कपात केली होती. त्यानंतर अनेक राज्यांनीही कर कपात केली. त्यामुळे त्या राज्यांमध्ये १५ ते २० रुपयांनी इंधनाचे दर कमी झाले होते. मात्र, ठाकरे सरकारने पेट्रोल-डिझेल वरील कर कमी करणार नसल्याचे स्पष्ट शब्दांत सांगितले होते.
केंद्र सरकारने पुन्हा २ महिन्यांपूर्वी अबकारी कर कमी केला. मात्र, त्यावेळीही ठाकरे सरकारने कर कपात करण्यास नकार दिला होता. कोविड बाबत झालेल्या आढावा बैठकीत खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही राज्यांना कर कमी करण्याची सूचना केली होती. त्यावर केंद्राने आम्हाला ‘जीएसटी’ परतावा दिलेला नाही, असं सांगून ठाकरे सरकारने कर कपात फेटाळली होती.
ठाकरे सरकार कोसळल्यानंतर सत्तेवर आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिलाच निर्णय इंधनाबाबत घेतला. लवकरच महाराष्ट्रात पेट्रोल व डिझेल वरील करात कपात केली जाणार असून, राज्यातील नागरिकांना स्वस्त दरात इंधन मिळणार असल्याचे शिंदे यांनी घोषित केले. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.