संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत
मनी लॅान्ड्रींगच्या आरोपात अडचणीत आलेल्या शिवसेनेच्या आमदार प्रताप सरनाईकांवर ईडीने २८ जुलैपर्यंत कोणतीही कारवाई न करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले आहेत. हायकोर्टाच्या या निर्णयामुळे आमदार प्रताप सरनाईक आणि त्यांच्या कुटुंबियांना दिलासा मिळत आहे. मनी लॅान्ड्रींग प्रकरणी ईडीने सुडबुद्धीने कारवाई करु नये यासाठी आमदार प्रताप सरनाईक यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडीने) अटक करु नये अशी मागणी याचिकेतून करण्यात आली होती. दरम्यान सरनाईक यांच्यासह त्यांचा मुलगा पूर्वेश, विहंग आणि मेहुणा योगेश चांदेगला यांनी याचिका दाखल केली होती. या याचिकांवर आज हायकोर्टाने सुनावणी देत आमदार प्रताप सरनाईकांवर ईडीने २८ जुलैपर्यंत कोणतीही कारवाई करु नये असे आदेश दिले आहेत.
मनी लाँड्रिंग प्रकरणी आज शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी विधानसभेच्या सभागृहातच आपल्यावर होत असलेल्या अन्यायाबद्दल आवाज उठवत दाद मागितली आहे. मी सत्ताधारी पक्षाचा आमदार असून माझ्यावर आरोप म्हणजे सरकारवर आरोप आहे. त्यामुळे सरकारने मला क्लिन चिट द्यावी, अशी मागणीच सरनाईक यांनी आज केली आहे.
मला ईडी कडून विनाकारण त्रास दिला जात आहे. लोकांना भुजबळ, अनिल देशमुख करेन अशी धमकी दिली जात आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या घोटाळ्याचा तपास हा ईडी ने घेतला. मी सत्ताधारी पक्षाचा आमदार आणि माझ्यावर आरोप होत आहे म्हणजे सरकारवरही आरोप होत आहे, असं सरनाईक म्हणाले. तसेच ‘मी गृहमंत्र्यांना ते पत्र लिहिलं आहे की, घोटाळा केला असेल तर प्रताप सरनाईकला अटक झाली पाहिजे पण जर घोटाळा झाला नसेल तर तो अहवाल बाहेर आणा नाहीतर क्लिनचिट द्या. जर मी गुन्हा केला असेल तर मला फासावर लटकवले पाहिजे, असंही सरनाईक म्हणाले. सरनाईक यांनी सभागृहात ईडी कडून होत असलेल्या कारवाईबद्दल आपली भूमिका मांडली.