संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
महाराष्ट्रात जून अखेरपासून आगमन झालेल्या पावसाने सोमवारी संध्याकाळनंतर राज्यात मुसळधारेसह हजेरी लावली. सोमवारी रात्री तसेच मंगळवारी दिवसभर अविश्रांत बरसणाऱ्या पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचून वाहतुकीचा खोळंबा झाला. नागरिकांच्या घरातही पाणी शिरले.
मुंबईसह कोकण विभागामध्ये शनिवारपर्यंत अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. प्रादेशिक हवामान विभागाने मुंबई, ठाण्यालाही शनिवारपर्यंत ऑरेंज अलर्ट दिला आहे. तर रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा घाट परिसर येथे शुक्रवारपर्यंत रेड अलर्ट आहे. पालघरलाही शुक्रवारी रेड अलर्ट असून इतर दिवशी ऑरेंज अलर्ट आहे.
मुंबईमध्ये मंगळवारी सकाळी ८.३० ला झालेल्या नोंदीनुसार आधीच्या २४ तासांमध्ये सांताक्रूझ येथे १२४.२ तर कुलाबा येथे ११७.४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. सोमवारी संध्याकाळनंतर पावसाचा जोर अधिक वाढला. मंगळवार पर्यंत तो कायम होता. कोकणातील पावसामुळे राज्यातील पावसाची सरासरी भरून येण्यासाठी मदत झाली आहे.
मराठवाड्यात नांदेड येथे चांगला पाऊस झाला असून तिथे ४७.४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्रात महाबळेश्वर येथे १४६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. राज्यात आता पाऊस सरासरीच्या श्रेणीत आला असून मंगळवारी सकाळी १२ टक्के तूट नोंदवली गेली. पावसामुळे मंगळवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ सुमारे अर्धा तास ठप्प झाले होते.
येत्या शनिवारपर्यंत राज्यात सर्वदूर पाऊस पडेल, अशी शक्यता आहे. मध्य प्रदेशावरील कमी दाबाचे क्षेत्र, गुजरात किनारपट्टीपासून महाराष्ट्राच्या किनारपट्टीपर्यंत ढगांची द्रोणीय स्थिती, दक्षिणेकडे सरकलेले मान्सून ट्रफ आणि पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्यांची वाढलेली तीव्रता या चार कारणांमुळे राज्यातील मान्सून सक्रिय झाला आहे, असे मुंबई प्रादेशिक विभागाचे प्रमुख डॉ. जयंत सरकार यांनी स्पष्ट केले.
या प्रभावामुळे कोकण विभागाव्यतिरिक्त मध्य महाराष्ट्रात नाशिक, पुणे येथेही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. कोल्हापूर, सातारा परिसरातील घाट क्षेत्रामध्ये तुरळक ठिकाणी अतितीव्र मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडू शकतो.
मराठवाड्यातही तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भात गुरुवारी अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, वाशिम, अकोला येथे तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.