संपादक : मोईन सय्यद/मिरा भाईंदर प्रतिनिधी
भाईंदर, 26 सप्टेंबर: ठाणे शहर वगळता मिरा भाईंदर, वसई-विरार आणि संपूर्ण ठाणे जिल्हा यापूर्वी ठाणे ग्रामीण पोलीस क्षेत्रा अंतर्गत येत होता. भरपूर मोठा परिसर, वाडा, जव्हार, मोखाडा सारखा अतिदुर्गम परिसर त्यातच अपुरा कर्मचारी-अधिकारी वर्ग त्यामुळे ठाणे ग्रामीण पोलिसांवर कामाचा खूपच ताण पडत होता. अनेक पोलीस अधिकारी-कर्मचारी बाहेरच्या शहरातून लांबून याठिकाणी कामावर येत असल्यामुळे त्यांच्यावर मानसिक आणि शारीरिक विपरीत परिणाम होत होते.
हा संपूर्ण विचार करूनच मिरा भाईंदर शहारा करिता स्वतंत्र पोलीस आयुक्तालय स्थापन करावे अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत होती. अखेर मिरा भाईंदर आणि वसई विरार या दोन जुळ्या शहराला मिळून एक पोलीस आयुक्तालय स्थापन करण्यात आलेला आहे. तर नव्यानेच स्थापन झालेल्या पोलीस आयुक्तालयाचा कार्यभार अत्यंत शिस्तप्रिय आणि कर्तव्यदक्ष म्हणून प्रसिद्ध असलेले प्रथम पोलीस आयुक्त सदानंद दाते (भाप्रसे) यांचेवर सोपविण्यात आलेला आहे.
पोलीस आयुक्त सदानंद दाते यांची नियुक्ती झाल्यानंतर नव्याने अस्तित्वात आलेल्या मिरा भाईंदर आणि वसई विरार शहरातील पोलीस ठाण्यात त्यांनी अनेक सकारात्मक बदल घडवून आणले आहेत. आता नुकतेच त्यांनी बिट मार्शल यांना अत्याधुनिक यंत्रणेसह सज्ज केले असून आपत्कालीन पोलीस मदत क्रमांक ‘112’ कार्यान्वित केला आहे. त्याच प्रमाणे शहरातील सर्व पोलीस ठाणे, बस स्थानक, रेल्वे स्थानक, शॉपिंग मॉल, महापालिका कार्यालय, शाळा, कॉलेज अशा मुख्य ठिकाणी ‘तक्रार पेटी’ ही संकल्पना देखील राबविण्यात येणार आहे.
ठाणे ग्रामीण पोलीस अस्तताना मिरा भाईंदर आणि वसई विरार परिसरातील पोलीस ठाण्यात तैनात असलेले अनेक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी हे ठाणे, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, शहापूर अशा दूर दूरच्या ठिकाणावरून कामावर येत होते. एव्हढ्या लांबून कामावर येत असताना त्यांचा बराचसा वेळ प्रवासातच वाया जात होता, त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर तर विपरीत परिणाम होतच होता परंतु त्यांना आपल्या परिवाराला देखील पुरेसा वेळ देता येत नसल्यामुळे त्यांच्यावर मानसीक तणाव देखील वाढत होता आणि या सर्वांचा एकूण परिणाम त्यांच्या कार्यक्षमतेवर देखील होत होता.
पोलीस आयुक्त सदानंद दाते यांनी पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची ही अत्यंत महत्त्वाची बाब ध्यानात घेऊन मिरा भाईंदर आणि वसई विरार शहरातील सर्व पोलीस ठाण्यातील मिळून जवळपास 240 पेक्षा जास्त पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या त्यांच्या मागणीनुसार सोयीच्या ठिकाणी बदल्या केल्या आहेत. या सर्व अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांना अनुक्रमे 23, 26 आणि 29 सप्टेंबर रोजी त्यांच्या बदलीच्या ठिकाणी हजर होऊन तसा अनुपालन अहवाल सादर करायचा आहे. त्याच प्रमाणे बाहेरून या शहरात बदली झालेल्या अनेक पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना देखील त्यांच्या पोलीस ठाण्यात हजर व्हायचे आहे. परंतु मिरा भाईंदर शहरातील अनेक पोलीस कर्मचाऱ्यांना त्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी अजूनही कार्यमुक्त केले नसल्यामुळे त्यांना बदलीच्या ठिकाणी अद्यापही हजर होता आलेले नाही आणि त्यामुळे पोलीस अधिकारी-कर्मचारी वर्गात नाराजी पसरलेली आहे.
नियमानुसार जर एखाद्या अधिकाऱ्याची अथवा कर्मचाऱ्याची बदली झाली असताना त्यांना बदलीच्या ठिकाणी 24 तासांच्या आत हजर होऊन तसा अनुपालन अहवाल वरिष्ठांकडे सादर करावा लागतो. परंतु मिरा भाईंदर, वसई विरार शहराच्या पोलीस ठाण्यातील बदली झालेले अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी कार्यमुक्त केले नसल्यामुळे त्यांना अजूनही आपापल्या बदलीच्या ठिकाणी हजर होता आलेले नाही आणि तसा अनुपालन अहवाल सादर करता आलेला नाही त्यामुळे हे बदली झालेले अधिकारी व कर्मचारी काहीसे नाराज झाले आहेत.
पोलीस आयुक्त सदानंद दाते यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेऊन जवळपास 240 पेक्षा जास्त अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत परंतु जर हे अधिकारी-कर्मचारी वेळेवर बदलीच्या ठिकाणी हजर झाले नाहीत तर त्यांचेवर शिस्तभंगाची नोटीस बजावली जाऊ शकते आणि त्यामुळे त्याचे नकारात्मक परिणामच अधिक होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. ही बाब ध्यानात ठेऊन बदली झालेल्या सर्व अधिकारी-कर्मचारी यांना त्वरित कार्यमुक्त करण्यासाठी संबंधित प्रभारी अधिकारी यांना निर्देश देण्यात यावेत अशी मागणी केली जात आहे.
आता पोलीस आयुक्त सदानंद दाते या गंभीर विषयावर काय निर्णय घेतात? आणि संबंधित प्रभारी अधिकाऱ्यांना काय आदेश देतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.