संपादक: मोईन सय्यद/ मुंबई प्रतिनिधी
भाईंदर, 29 सप्टेंबर: मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता दिपक खांबीत यांच्या गाडीवर घरी जाताना बोरिवली नॅशनल पार्क, कृष्णा बिल्डिंगच्या समोर ओंकारेश्वर मंदिराजवळ गोळीबार झाला आहे. मोटारसायकल वरून आलेल्या दोन अज्ञान इसमांनी हा गोळीबार केला असल्याची माहिती मिळाली आहे. मुंबई पोलीस उपायुक्तांसह अनेक पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत.
दीपक खांबीत गोळीबाराच्या सदरील घटनेत सुखरूप असले तरी त्यांच्या हाताला किरकोळ जखम झाली असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान हा हल्ला कोणी केला? कसा केला? आणि का केला? याचा पोलीस अधिक तपास करत आहेत.
दीपक खांबीत आपले दिवसभराचे काम संपवून त्यांच्या कारने बोरिवली येथील घरी जात असताना सायंकाळी बोरिवली येथे महामार्गावर वाहतूक कोंडी झालेली असताना आणि अत्यंत गर्दीच्या ठिकाणी अचानक झालेल्या या गोळीबारामुळे पोलिसही चक्रावून गेले आहेत. सद्ध्या पोलीस परिसरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे तपासून पाहात आहेत.