संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
मुंबई, कुर्ला, बांद्रा, ठाणे, पुणे रेल्वे स्थानकांवर गर्दी
मुंबईसह राज्यातील कोरोनाची वाढती रूग्णसंख्या आणि पुन्हा टाळेबंदीच्या भीतीने मुंबई आणि राज्याच्या अंतर्गत भागांत रोजगारासाठी आलेल्या परराज्यातील, परगावातील नागरिकांनी पुन्हा एकदा परतीची वाट धरली आहे.
बांद्रा व लोकमान्य टिळक कुर्ला टर्मिनसवर सकाळपासून उत्तर भारताकडे जाणाऱ्या प्रवाशांनी मोठी गर्दी केली.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, ठाणे, दादर स्थानकातही परगावी जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी वाढली. तर पुण्यातही हीच स्थिती आहे.
काही महिन्यांपूर्वी आटोक्यात आलेल्या करोनाने पुन्हा एकदा हाहाकार माजवला आहे.
मुंबई, ठाणे, नवी मुंबई, डोंबिवली व कल्याण शहर आणि उपनगरांत कोरोना रुग्णांची संख्या मोठय़ा झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिका आणि राज्य शासनाने शहरात कडक निर्बंध लागू केले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समाजमाध्यमांवरून जनतेशी साधलेल्या संवादादरम्यान पुन्हा टाळेबंदीचे संकेत शुक्रवारी दिले असता त्यांची परतण्याची तयारी सुरु झाली आहे.
त्यामुळे गेल्या वर्षीच्या अनुभवाने धास्तावलेले कामगार, विद्यार्थी यांनी आपल्या मूळगावी धाव घेण्यास सुरुवात केली आहे.
आरक्षित आसनांची क्षमता संपली?
अनेक गाडय़ांतील पुढील काही दिवसांची आरक्षित आसनांची क्षमता संपली असून यातून रोज ३५ हजार प्रवाशी प्रवास करत आहेत.
सी.एस.एम.टी. रेल्वे स्थानकात परराज्यात जाणाऱ्या नागरिकांची गर्दी झाली आहे.