संपादक: मोईन सय्यद/मीरा भाईंदर, प्रतिनिधी
भाईंदर: कोरोना महामारीच्या काळात संपूर्ण महाराष्ट्रात टाळेबंदी म्हणजेच लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. या लॉकडाउनमुळे अनेक उद्योगधंदे, व्यवसाय ठप्प झाले असल्यामुळे कोट्यवधी लोकांचा रोजगार नष्ट झाला आहे.
लॉकडाउनच्या नियमामुळे नाट्यगृह, सिनेमागृह आणि रंगमंच अद्यापही सुरू करण्यात आलेले नाहीत त्यामुळे यावर अवलंबून असलेल्या कलाकारांचा रोगजार नष्ट झाला असून आता त्यांच्या जीवनमरणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
याच विषयावर शासनाचे लक्ष वेधून घेण्याकरिता मीरा- भाईंदर शहरातील रंगकर्मी आंदोलन महाराष्ट्र व निर्भय भारत सामाजिक संगठना सांस्कृतिक विभाग यांच्या तर्फे भाईंदर पूर्वेच्या गोल्डन नेस्ट सर्कल येथे सोमवारी सकाळी ११ च्या सुमारास रंगमंचावर आपली कला सादर करणाऱ्या विविध कलाकारांना सोबत घेऊन आपल्या हक्कासाठी हातात न्याय मागणारे फलक धरून शांततेत आंदोलन करण्यात आले.
कोरोनाच्या काळात लावण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे लागू करण्यात आलेल्या निर्बंधामुळे नाट्य कलाकाराना स्वतःचे जीवन जगणे आता कठीण झाले असून अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
इतर दुकाने, कारखाने, छोटे मोठे उद्योग आता हळूहळू सुरू होऊ लागले आहेत मात्र थिएटर, नाट्यगृह, सिनेमागृह यांच्यावर अद्यापही बंदी लावण्यात आली आहे. त्यामुळे यांच्यावर अवलंबून असलेल्या कलाकारांचे जगणे कठीण झाले आहे. रंगमंच, नाट्यगृह यावर लावण्यात आलेली बंदी हटवण्यासाठी ‘रंगमंच कलाकारांनी आपआपल्या वाद्ययंत्रासह आंदोलनात सहभाग घेतला.
यावेळी कलाकारांनी “कोरोना ने मरु कि नाही माहीत नाही भुखेने मात्र नक्कीच मरु” अश्या प्रकारची घोषणाबाजी करत स्वतःच्या हातात मला माझे वाद्ययंत्र विकायचे आहे असे लिहलेले फलक धरले होते. या आंदोलनात 300 पेक्षा जास्त रंगमंच कलाकार उपस्थित होते.
या आंदोलना नंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मीरा भाईंदर जिल्हाध्यक्ष अंकुश मालुसरे यांच्या नेतृत्वात कलाकारांनी नवघर पोलिसांना तसेच तहसीलदार यांना निवेदन दिले. या आंदोलनात निर्भयभारत सामाजिक संगठनचे अध्यक्ष अंकुश मालुसरे, अभिजीत घोषाल, कुलदीप मालुसरे, रोहित गुप्ता, समृद्धि कारेकर, एलेक्स पिल्लई, सचिन जावळे, अशोक गेहलोत, राकेश गेहलोत, प्रगति तुरेकर, रविंद्र अल्हाट, मनीष सोलंकी, वासु पाटिल, कौस्तुभ कारेकर, अमर थोरात, चंद्रकांत करजावकर, राजीव, संदीप येल्वे, प्रकाश चौहान, राजेश तिवारी, आशीष मिस्त्री, भरत रामजी सोलंकी, सिंगर देवा, सूर्यकांत चव्हाण, अरुण सोलंकी, हिरन डोबरिया, दिगंबर पांचाल व इतर रंगमंच कलाकार उपस्थित होते.