संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
कोरोना महामारीचं महाभयंकर संकट राज्यासह देशात आल्यापासूनच सर्व धार्मिक स्थळे नागरिकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आली आहेत. मात्र कालपासून श्रावण महिणा सुरु झाला असून हा महिना हिंदू धर्मियांसाठी अतिशय महत्वाचा मानला जातो अशातच सरकारने आतातरी मंदिर उघडावी अशी मागणी सध्या सगळ्या स्तरातून जोर धरू लागली आहे. सध्याची परिस्थिती पाहता राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होत आहे.
त्यामुळे राज्यातील काही जिल्ह्यांना सरकारकडून निर्बंधांमध्ये शिथिलता देऊन दिलासा देण्यात आला आहे आणि काही जिल्ह्यांमधील कोरोना निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, ‘तसेच मंदिरं उघडणे आणि लग्न समारंभासारख्या मोठ्या कार्यक्रमांना परवानगी देण्याबाबत थोडी वाट पहावी लागेल.’ असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान तज्ज्ञांनी शाळा दिवाळीनंतर सुरू कराव्यात आणि मंदिर सुरू करण्याची राज्य सरकारने घाई करू नये असा सल्ला दिला आहे. याबाबत राजेश टोपे म्हणाले की, ‘कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शाळा, कॉलेजचा निर्णय संबंधित विभाग घेतील. मंदिरे उघडण्यासाठी आणि लग्नसराई कार्यक्रमांना परवानगी देण्यासाठी थोडी वाट बघू. घाई गडबडीने काही गोष्टी केल्या तर त्याच्यामुळे काही अनर्थ होऊ नये, संक्रमण खूप वाढू नये, या सगळ्या गोष्टींच्या काळजी पोटी मुख्यमंत्र्यांनी काही काळजीपूर्वक गोष्टी सुचवल्या आहेत. त्यामुळे याबाबत थोडी वाट बघावी लागेल.’ असे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान आता भाजपच्या अध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी राज्य सरकारला दोन दिवसात मंदिरे खुली करण्याची मागणी केली आहे. इतकेच नव्हे तर त्यांनी मंदिरे खुली न केल्यास आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रसिद्धी माध्यमांना यावेळी बोलताना सांगितले.