Latest News आपलं शहर कोकण ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

डोंबिवलीचे माजी शहरप्रमुख भाऊ चौधरी यांची शिवसेनेतून हकालपट्टी; शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली घोषणा..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवलीचे रहिवासी शिवसेनेचे (उध्दव बाळासाहेब ठाकरे) माजी शहरप्रमुख आणि नाशिकचे जिल्हा संपर्कप्रमुख भाऊ चौधरी यांची बुधवारी शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात येत असल्याचे ट्वीट शिवसेना नेते संजय राऊत यांनी केल्याने खळबळ उडाली. संजय राऊत यांचे खास म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भाऊंची शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आदेशावरुन पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

संजय राऊत यांचे खास समर्थक म्हणून मागील अनेक वर्षापासून भाऊ चौधरी यांची ओळख होती. राऊत यांचा आश्रय आणि आशीर्वादाने भाऊ चौधरी यांनी शहरप्रमुख, पालिका निवडणुकीतील उमेदवारी ते नाशिक जिल्हा संपर्कप्रमुख पदापर्यंत मजल मारली होती. कोणतेही संघटन कौशल्य, जनसंपर्क नसलेला आणि सामान्य शिवसैनिकाला मानाची पदे देण्यात आल्याने डोंबिवलीतील जुनेजाणते शिवसैनिक त्यावेळी नाराज होते. राऊत यांचा पाठिंबा असल्याने उघडपणे कोणीही याविषयी चकार शब्द काढत नव्हते.

डोंबिवली शिवसेनेचे शहरप्रमुख म्हणून भाऊ चौधरी यांनी पदभार सांभाळला होता. या कालावधीत विधायक कामे करण्यापेक्षा सवतासुभा पध्दतीने कामे करण्याची त्यांची पध्दत असल्याने निष्ठावान शिवैसनिक मध्यवर्ति शाखेपासून दुरावले होते. राऊत आणि थेट मातोश्रीचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे असा भाऊंचा अविर्भाव असल्याने त्यांच्या वाटेला कोणत्याही शिवसैनिकाने कधी जाण्याचा प्रयत्न केला नाही, असे आता शिवसैनिक उघडपणे बोलतात.

शहरप्रमुख असताना संघटनापेक्षा गटतटाचे राजकारण अधिक तयार झाले होते. कोणतेही विधायक कार्यक्रम त्या काळात शहरप्रमुख त्यांनी राबविले नाहीत. गॅस पुरवठादार व्यावसायिक म्हणून भाऊंची ओळख आहे. डोंबिवली एमआयडीसी परिसरात त्यांची ‘मॉडर्न गॅस’ कंपनी आहे. कोरोना महासाथीच्या काळात ठाणे जिल्ह्यातील रुग्णालयांना वेळेवर ऑक्सिजन पुरवठा झाला पाहिजे म्हणून स्थापन समितीत भाऊ चौधरी यांचा सक्रिय सहभाग होता. नगरविकास मंत्री असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकारी यांच्या समन्वयाने जिल्ह्याला सुरळीत ऑक्सिजन पुरवठा करण्याच्या कामात भाऊंनी महत्वाची जबाबदारी पार पाडली होती. कोरोना काळात नाशिकमधील शेतकऱ्यांची औषध फवारणी यंत्र कल्याण, डोंबिवलीत आणून शहर स्वच्छतेत त्यांनी महत्वाची कामगिरी पार पाडली होती. स्वच्छतेचा नाशिक पॅटर्न म्हणून हा उपक्रम प्रसिध्द झाला होता.

रावसाहेब दानवे भाजपचे प्रदेशाध्यक्ष असताना त्यांनी शिवसेनेविषयी काही वाद्ग्रस्त वक्तव्य केले होेते. त्यावेळी दानवे यांचा निषेध करण्यासाठी भाऊ चौधरी यांनी दानवे यांच्या प्रतिमेची गा‌ढवावरुन धिंड काढली होती. त्याचा राग आल्याने भाजपचे माजी नगरसेवक आणि आता शिंदे गटातील महेश पाटील यांनी भाऊ चौधरी यांना त्यांच्या गोग्रासवाडीतील घराजवळ गाठून भाऊंच्या तोंडाला काळे फासले होते. यावेळी प्रतिकार करण्याऐवजी काळे फासताना भाऊ चौधरी हसत असल्याचे छायाचित्र समाजमाध्यमात प्रसारित झाले होते. त्याचीच चर्चा सर्वत्र त्यावेळी सुरू होती. या प्रकाराविषयी शिवसेना नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. मागील निवडणुकीत ते कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या नगरसेवक पदाचे उमेदवार होते. दांडगा जनसंपर्क नसल्याने ते पराभूत झाले होते. डोंबिवलीत शिवसेनेचा कोणताही पदाधिकारी, शिवसैनिक, नगरसेवक यांच्याशी त्यांचे सख्य नव्हते. नेते संजय राऊत भाऊंच्या पाठीशी असल्याने कोणी कधी भाऊंशी पंगा घेण्याचा घेण्याचा प्रयत्न केला नाही.

नाशिकमध्ये नाराजी

नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख असतानाही स्थानिक खासदार, आमदार, पदाधिकारी चौधरी यांच्या कामकाज पध्दतीमुळे नाराज होते. स्थानिक पातळीवर भाऊंचे कोणत्याही पदाधिकाऱ्याशी सूत जुळत नसल्याने त्यांना नाशिकमध्ये पदाची सोय करुन देण्यात आली होती. अशी चर्चा होती.

आर्थिक कोंडीमुळे शिंदे गटात उडी

ठाणे जिल्ह्यातील अनेक महापालिका, इतर शासकीय विभागात भाऊ चौधरी निविदा प्रक्रियेतील स्पर्धेतून कामे घेत होते. बहुतांशी कामे वरिष्ठांच्या आशीर्वादाने भाऊंना मिळत होती. या कामांची देयके भाऊंचे वरपर्यंत असणाऱ्या संपर्कामुळे झटपट मिळत होती. शिवसेनेत फूट पडुनही भाऊंनी उध्दव ठाकरे यांच्या सोबत राहणे पसंत केले होते. कामे आमच्यामुळे (शिंदे गट) मिळाली आणि सोबत (ठाकरे गट) त्यांना देता. त्यामुळे शिंदे गटाकडून भाऊंची महापालिकांमधील कामे, देयकांबाबत कोंडी करण्यास सुरुवात झाली होती. तो त्रास वाढू लागल्यामुळे भाऊ शिंदे गटाच्या मार्गावर असल्याची कुणकुण लागताच उध्दव ठाकरे यांनी भाऊंची हकालपट्टी केली असल्याचे समजते. भाऊंना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तो होऊ शकला नाही. भाऊ तिकडे गेल्यामुळे आम्हाला काही फरक डोंबिवलीत पडणार नाही असे शिवसेनेच्या (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पदाधिकाऱ्यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सांगितले.

 

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *