संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
कोरोनाकाळात कित्येक सहृदयी पोलिसांनी समाजभान जपत नागरिकांची सेवा केली.
मुंबईतील सशस्त्र दलात पोलीस नाईक पदावर कार्यरत असलेल्या रेहाना शेख यांनी मात्र गेल्या सव्वा वर्षात आपल्या कामासह राज्यभरातील हजारो कोरोनारुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना औषधांपासून सर्व प्रकारची मदत मिळवून देत सेवाव्रताचा नवा आदर्श समोर ठेवला आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत पोलीस दलात कोरोना संसर्ग बऱ्यापैकी फोफावला होता.
याच काळात एका अडलेल्या सहकाऱ्याने त्यांच्याकडे आपल्या वृद्ध आईसाठी रक्तद्रव (प्लास्मा) उपलब्ध करून देण्याची विनंती केली.
रेहाना शेख यांचा दांडगा जनसंपर्क आणि मदतीला धावून जाण्याचा स्वभाव यांतून तातडीने या सहकाऱ्याच्या आईला प्लाझ्मा मिळाला. त्यानंतर शेख यांनी करोना रुग्ण आणि त्यांच्या हतबल नातेवाईकांना लागणारी मदत मिळवून देण्याचा चंग बांधला. बाधितांना रेमडेसिविर इंजेक्शन, टोसिलीझुमॅब इंजेक्शन आदी औषधे, खाट, प्लास्मा, रक्त उपलब्ध करून देण्यासाठी रेहाना यांनी आपला जनसंपर्क कामी आणला.
आपली नोकरी, संसार आणि दुर्धर आजाराने ग्रासलेल्या बहिणीची शुश्रूषा या सर्व आघाड्यांवर पुरून त्यांनी समाजसेवेचा हा गाडा अविरत सुरू ठेवला.
राज्यातील विविध भागांतून त्यांचा फोन चोवीस तास मदतीसाठी खणखणू लागला आणि गरजूंना मदत मिळेस्तोवर त्यांच्यासाठी रेहाना शेख झटत राहिल्या. मुंबई पोलिसांनी सुरू केलेल्या कोव्हिड कक्षातूनही रेहाना यांना विनंत्या येऊ लागल्या.