Latest News आपलं शहर कोकण ताज्या पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही समाज प्रबोधन करणारी, डोके चालवा चळवळ: अण्णा कडलास्कर


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही विज्ञाननिष्ठ विचारांचा प्रचार आणि प्रसार करणारी, समाज प्रबोधन करणारी, डोके चालवा चळवळ आहे. येथील समाज व्यवस्थेला सातत्याने प्रश्न विचारणारी चळवळ आहे, यातूनच समाजातील अनिष्ट रूढी परंपरांना आव्हान देत शोषणमुक्त समाजाच्या निर्मितीसाठी सामाजिक बांधिलकी जोपासणारी संघटना आहे, असे मत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यकारिणी सदस्य श्री.अण्णा कडलास्कर यांनी ‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि सामाजिक बांधिलकी’ या विषयावर मांडणी करताना व्यक्त केले. अंधश्रद्धा निर्मूलन समिती मोहने शाखा व भारतीय बौद्ध महासभा मोहने शहर यांच्या संयुक्त विद्यमाने केलेल्या एक दिवसीय शिबिरात ते बोलत होते.

रविवार दिनांक १७.७.२०२२ रोजी प्रज्ञा बुद्ध विहार, मोहने येथे सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत अंधश्रद्धा निर्मूलन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराच्या प्रथम सत्राचे उद्घाटन श्री.अण्णा कडलास्कर यांच्या हस्ते विवेकाची ज्योत प्रज्वलित करून झाले. यावेळी के.पी.गायकवाड हे अध्यक्षस्थानी होते. सुरुवातीला अण्णा कडलास्कर, राजू कोळी, सुनीता चंदनशिवे, सरिता ससाने यांनी प्रबोधनात्मक गीतांचे सादरीकरण केले. प्रथम सत्रात श्री.अण्णा कडलास्कर यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्य व विविध उपक्रम याबाबत उदाहरणे देवून, जादूटोणा विरोधी कायदा , विज्ञान बोध वाहिनी इत्यादी विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले. संत तुकाराम, संत गाडगेबाबा या सुधारकी संतांची परंपरा लाभलेल्या, फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रात समाज प्रबोधनाची चळवळ पुढे घेऊन जाण्याचे, समाजाला दिशा देण्याचे काम महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती मागील ३२ वर्षांपासून करीत असल्याचे मत व्यक्त केले. आपण आयोजित केलेल्या एका दिवशी शिबिरांच्या माध्यमातून ही चळवळ आणखी जोमाने पुढे जाईल असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष श्री.अशोक वानखेडे यांनी ‘वैज्ञानिक दृष्टिकोन’ या विषयाची मांडणी केली. आपण विज्ञानाची सृष्टी स्वीकारली परंतु त्याची दृष्टी घेतली नाही, याबाबत खंत व्यक्त करून अनेक उदाहरण देऊन ‘वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे नेमके काय ?’ हे समजावून सांगितले.

दुसऱ्या सत्रात अध्यक्षस्थानी अश्विनीताई माने या होत्या. या सत्राची सुरुवात ऐश्वर्या पवार, राजू कोळी,भीमराव खेत्रे यांच्या चळवळीच्या गीतांनी झाली. त्यानंतर डोंबिवलीतील प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, डोंबिवली शाखेचे अध्यक्ष डॉ‌. दुष्यंत भादलीकर यांनी ‘मन व मनाचे आजार’ या विषयाची मांडणी अतिशय सोप्या पद्धतीने केली. मनाचे आजार किती प्रकारचे असतात, त्याची लक्षणे कशी ओळखावी याबाबत सविस्तर, उदाहरणासह मार्गदर्शन केले. असे आजार लक्षात आल्यास त्वरित मानोसपचार तज्ञाचा सल्ला घ्यावा असा सल्लाही त्यांनी दिला. मात्र बऱ्याचदा मानसिक रुग्णाला भगत, बुवा- बापू, महाराजांच्याकडे नेले जाते. त्यातून त्यांचे आर्थिक, शारीरिक, मानसिक शोषण कसे केले जाते यावर प्रकाश टाकला. त्यानंतर के.पी गायकवाड यांनी ‘व्यसन व त्याचे दुष्परिणाम’ या विषयावर मार्गदर्शन करताना व्यसनाचे प्रकार, त्याचे दुष्परिणाम याविषयी माहिती दिली. विवेकवादी चळवळीतील कार्यकर्त्याने सर्व प्रकारच्या व्यसनांपासून दूर राहिले पाहिजे असे कळकळीचे आवाहन केले.

डी.जे वाघमारे यांनी ‘व्यक्तिमत्व विकास’ या विषयाची मांडणी करताना व्यक्तिमत्त्व विकासाचे विविध पैलू अनेक उदाहरणे देऊन समजावून सांगितले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीच्या सोबत जोडून घेतलेल्या कार्यकर्त्यांचा सर्वांगीण विकास, व्यक्तिमत्वाचा विकास कसा घडतो, याबाबत सविस्तर विवेचन केले.

याच कार्यक्रमात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यकारणी सदस्य प्रा. प्रवीण देशमुख सर हे व्हीजेटीआय या प्रसिद्ध अभियांत्रिकी महाविद्यालयातून ३२ वर्षांच्या प्रदीर्घ सेवा कालानंतर सेवानिवृत्त झालेत, त्याचे औचित्य साधून त्यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. मागील २८ वर्षांपासून प्रा.प्रवीण देशमुख हे चळवळीशी जोडले गेले आहेत. आता निवृत्तीनंतर आणखी वेगाने ही चळवळ पुढे नेण्यासाठी ते मार्गदर्शन करतील, आम्ही त्यांच्या निवृत्तीचीच आतुरतेने वाट बघत होतो, अशा भावना सत्कार करताना व्यक्त केल्या.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा सर्व आर्थिक व्यवहार ज्या ट्रस्टच्या मार्फत चालतो त्या
‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती, महाराष्ट्र’ चे विश्वस्त श्री. गणेश चिंचोले यांनीही या शिबिराला आवर्जून उपस्थिती लावली व अतिशय चांगल्या शिबिराचे आयोजन केल्याबद्दल आयोजक समितीचे कौतुक केले.

त्याचबरोबर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मुखपत्र असलेले ‘अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र’ चे सर्वांनी सभासद व्हावे असे आवाहनही केले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, डोंबिवली शाखेचे अध्यक्ष व सुप्रसिद्ध चित्रकार श्री.उदय देशमुख यांनीही समयोचित मार्गदर्शन केले. यानंतर अविंदाताई वाघमारे यांनी ‘अंधश्रद्धा एक सामाजिक समस्या’ या विषयावर मार्गदर्शन करताना श्रद्धा अंधश्रद्धा त्यांचे प्रकार, स्त्रियांची व्रतवैकल्ये व अंधश्रद्धा, या विषयावर मांडणी केली. किरणताई जाधव यांनी विधवा स्त्रियांना समाजांत मिळणारी दूय्यम वागणूक याविषयीचे प्रबोधन केले.

त्याचबरोबर हेरवाड व माणगांव या ठिकाणी घेतलेल्या विधवा स्त्रियांच्या संदर्भात ग्रामपंचायतीने केलेल्या क्रांतिकारी अशा ठरावा विषयीची माहिती दिली. विधवा स्त्रियांना, दुय्यम वागणूक देण्याची, सार्वजनिक उपक्रमातून बहिष्कृत करण्याची मानसिकता, आता बदलायला हवी असे मत व्यक्त केले. यानंतर आकाश पवार व साथींनी चळवळीची गीते गायली गौतम मोरे यांनी आभार मानले. प्रथम सत्राचे सूत्रसंचालन अविंदाताई वाघमारे यांनी केले. तर द्वितीय सत्राचे सूत्रसंचालन राजेश मोरे यांनी केले. सदर कार्यक्रमासाठी डाॅ.जाधव, नागले सर, पत्रकार सोनवणे, जे.एस शिंदे, डी.के.भादवे, निर्मला बोखारे, मधुकर कांबळे, मधुकर पवार, संदीप शिंदे, निशा भोईर , किरण कांबळे, प्रदीप उपदेशे, राधाताई गायकवाड, संदिप शेंडगे, आनंद सोनवणे हे सर्व साथी उपस्थित होते. सर्वांच्या सक्रिय सहकार्यामुळे शिबिर यशस्वी झाले. १०० पेक्षा जास्त साथी या शिबिराला उपस्थित होते.?अशा शिबिरांची समाज प्रबोधनासाठी वारंवार गरज आहे असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *