मुंबई, अंधेरी, प्रतिनिधी : चित्रपट सृष्टीमध्ये काम करण्यास इच्छुक असलेल्या तरुणींना नवीन चित्रपटात ब्रेक देण्याच्या बहाण्याने त्यांच्या अश्लील चित्रफीत काढून प्रसारित करणाऱ्या एका पॉर्न फिल्म प्रोडक्शन कंपनीचा पर्दाफाश मुंबईतील मालाड पोलिसांच्या मालमत्ता कक्षाने केला. या प्रकरणी पोलीस पथकाने पाच आरोपीना बेड्या ठोकल्या आहेत.
या प्रकरणी मालाडाच्या मालवणी पोलीस ठाण्यात भादंवि कलम 292, 293, 420, 34 सह कलम 67 अ माहिती आणि तंत्रज्ञान अधिनियम सुधारित 2008 सह कलम 2 ग सह 3, 4, 6 आणि 7 स्त्रियांचे असभ्य प्रतिरूपण अधिनियम 1986 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी 6 मोबाईल, एक लॅपटॉप, स्पॉट लाईट, केमेरा, मेमरी कार्ड असा लाखोंचा मुद्देमाल देखील हस्तगत केला आहे.
मालमत्ता कक्षाच्या पथकाने अटक केलेल्या आरोपींमध्ये फोटोग्राफर 40 वर्षीय, 33 वर्षीय महिला ग्राफिक डिझाइनर, 28 वर्षीय पुरुष लाईटमॅन आणि केमेरा मॅन 26 वर्षीय पुरुष अभिनेता आणि 24 वर्षीय पुरुष अभिनेता यांचा समावेश होता. अटक सर्व आरोपीना 10 फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणाचा तपास पोनि. धीरज कोळी करीत आहेत.
हि टोळी पॉर्न कंपनी चालवीत होती. गरजू मुलींना महिलांना आणि फिल्म इंडस्ट्रीज मध्ये स्ट्रगल करणाऱ्या मुलींना नवीन चित्रपटामध्ये काम करण्याची संधी देण्याच्या बहाण्याने त्यांच्या अश्लील चित्रफीत तयार करून त्या प्रसारित करीत होते. सदर चित्रफीत मोबाईल ऍप्सवर प्रसारित करून लाखो रुपयांची कमाई करण्यात येत होती.
मालमत्ता कक्षाला पॉर्न कंपनी हि मढ येथे बंगल्यात पॉर्न शूटिंग करणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार कारवाई करून पोलीस पथकाने पाचजणांना अटक केली. या टोळीने पॉर्न कंपनीद्वारे व्हिडियो अपलोड करण्यासाठी सबस्क्रिप्शनच्या माध्यमातून लाखोंची कमाई करीत असल्याची माहिती समोर आली. दरम्यान अशा प्रकारे अनेक महिलांची आणि तरुणींनींची फसवणूक करण्यात आल्याचे समोर आले आहे.