संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मनसेने पत्र लिहिलं आहे. मनसेतर्फे आयोजित करण्यात आलेली हनुमान चालिसा रथ यात्रा रद्द करण्यात आली. या यात्रेवर कायदा आणि सुव्यवस्था यावरून कारवाईचा बडगा उचलल्याने महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष तसंच माहिम विधानसभा अध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या नाराजीत त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलं आहे. शिवसेना भवनात हनुमान चालिसा आणि आरती करण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी, या पत्रातून करण्यात आली आहे.
यशवंत किल्लेदार यांनी १६ एप्रिलला हनुमान जयंती निमित्त शिवसेना भवनात हनुमान चालिसा आणि आरती करण्यासाठी परवानगी द्या अशी पत्रातून मागणी केली आहे. सर्व ठिकाणी कारवाई करत आहात म्हणून शिवसेना भवन हे सर्वांसाठी मंदिर आहे त्यामुळे परवानगी द्या, असं किल्लेदार यांनी पत्रात म्हटलं आहे.
शिवसेनेतील नेते मंडळी समाज माध्यमाच्या माध्यमातून सेना भवन मध्ये असलेल्या भवानी मातेच्या मंदिरासमोर आरती करण्याचा सल्ला देतात. केवळ म्हणूनच मी या पत्राद्वारे आपणांस विनंती करतो की, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांमुळे शिवसेना भवन हे तुमच्यासह सर्व हिंदूचे श्रद्धास्थान (मंदिर) आहे. त्यामुळे शनिवार दिनांक १६ एप्रिल रोजी हनुमान जयंती दिनी सेना भवन मधील भवानी मातेच्या मंदिरात आम्हा मनसैनिकांना हनुमान चालीसेसह आरती करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी मनसे उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी पत्राद्वारे केली आहे.