अवधूत सावंत, डोंबिवली प्रतिनिधी : डोंबिवलीतील भोपर गावात अकरा वर्षीय मुलीचा खदानीच्या पाण्यात पाय घसरून बुडून मृत्यू झाला ही हृदयद्रावक घटना भोपर गावात असलेल्या खदानीत घडली आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे..
आईसोबत खदानीच्या साचलेल्या पाण्यात कपडे धुण्यासाठी गेलेल्या एका अकरा वर्षीय मुलीचा पाय घसरून पाण्यात पडल्याने तिचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही हृदयद्रावक घटना डुबरी नजीकच्या भोपर गावात असलेल्या खदानीत घडली आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. करिष्मा वीरेंद्र यादव (11) असे पाण्यात बुडून दुर्दैव मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे.
खदानीत कपडे धुणे बेतले मुलीच्या जीवावर मृत करिष्माचे आई-वडील मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांची मुलगी करिष्माही आईसोबत आज दुपारच्या सुमारास डोंबिवलीनजीक भोपर गावात असलेल्या खदाणीवर गेली होती. मात्र त्यावेळी कपडे धुतानाच तिचा पाय घसरल्याने ती खोल पाण्यात पडली. मुलगी खदानीच्या पाण्यात पडल्याचे पाहून आईसह बाजूला कपडे धूत असलेल्या महिलांनी तिला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र ती बुडाल्याने महिलांनी आरडाओरड केल्याने परिसरातील नागरिकांनी धाव घेत, तिला पाण्यातून बाहेर काढले, मात्र तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता.पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी भोपर गावात पाण्याची टंचाई असल्याने खदानीत कपडे धुण्यासाठी या परिसरातील चाळीत राहणाऱ्या महिला जात असतात. विशेष म्हणजे या परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत चाळी उभारल्या जात असून या चाळीत राहणाऱ्या नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठीही वणवण भटकंती करावी लागते. सहाजिकच या भागात राहणाऱ्या गरीब नागरिकांना बाजूला असलेल्या खदाणीच्या पाण्याचा कपडे धुण्यासाठी उपयोग करावा लागतो. धक्कादायक बाब म्हणजे या खदानीत कपडे धुण्यासाठी उतरणार्या महिला व मुलींना यापूर्वीही अनेकांनी आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने या भागात पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.