ताज्या देश-विदेश

वन विभागाच्या हलगर्जीपणामुळे पुण्याच्या कोथरूड भागात शिरलेल्या रानगव्याचा दुर्दैवी मृत्यू !

पुणे, प्रतिनिधी : पुण्यात बुधवारी कोथरुड भागातल्या महात्मा सोसायटीत रानगवा शिरला. पोलीस, अग्निशमन दल, वनविभाग यांनी बघ्यांच्या गर्दीला प्रतिकार करत या रानगव्याची सुटका करण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केले. भुलीचं इंजेक्शन देऊन तसंच जाळीचा वापर करून त्याला रोखण्यात आलं. भूगावच्या प्राणी केंद्रात त्याला नेण्यात आलं. मात्र रानगव्याने तिथे प्राण सोडले.

मानवी वस्तीत येणाऱ्या प्राण्यांच्या निमित्ताने प्राणी विरुद्ध माणसं हा संघर्ष अनेक महानगरांमध्ये तीव्र होताना दिसतो आहे. पुण्यातल्या गच्च लोकवस्तीच्या भागात आलेल्या रानगव्याविषयी फार माहितीही लोकांना नव्हती.

सुरुवातीला अनेकांना म्हैसच वाटली, मात्र रंग, चेहरा आणि आकारमान पाहून हा वेगळा प्राणी असल्याचं स्थानिकांच्या नंतर लक्षात आलं.

पुण्यातल्या शहरी भागात आलेला गवा नर होता. त्याचं वजन जवळपास 700 ते 800 किलो एवढं होतं. पाच ते साडेपाच फूट एवढी त्याची उंची होती.

पुणे शहरालगतच्या मुळशी, वेल्हा, पुरंदर हे तालुके आहेत. या भागात दाट झाडी आणि डोंगरारांगा आहेत. पुण्याच्या काही भागात बिबट्या आला होता. सात वर्षांपूर्वी भारती विद्यापीठ परिसरात गवा आला होता.

“पश्चिम घाट परिसरात रानगवे सर्रास आढळतात. एका रानगव्याचं वजन साधारण 700-1000 किलो असू शकतं. आकारमान मोठं असलं तरी हा प्राणी लाजाळू असतो,” असं संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. शैलेश पेठे यांनी सांगितलं.

त्यांनी रानगव्याच्या गुणवैशिष्ट्यांसंदर्भात अधिक माहिती देताना सांगितलं की, “पुण्यात घडलेल्या प्रकारातही गव्यासमोर पाचशेहून अधिक माणसं होती. त्यांच्यापैकी एकालाही छोटी जखमही झाली नाही. गव्याने त्यांना काहीही केलं नाही. म्हैस असती तर उपस्थित लोकांपैकी एखाद्याला फ्रॅक्चर किंवा गंभीर जखम झाली असती. रानटी म्हशी आक्रमक असतात, त्या एकत्र येऊन सिंहावर हल्ला करू शकतात पण गवा तसं करत नाही. कळपाने राहतात.”

“गव्याची घाणेंद्रियं तीक्ष्ण असतात. त्यामुळे वास तीव्रतेने कळतात मात्र ऐकण्याची क्षमता आणि दृष्टी तितकी सक्षम नसते. प्रचंड शरीर आणि वास ओळखण्याची हातोटी हे गव्याचं गुणवैशिष्ट्य असतं,” असं खरे यांनी सांगितलं.

“पूर्ण वाढ झालेल्या गव्याचं वजन हजार किलोपर्यंत असू शकतं. गव्याला ओळखण्याची मुख्य खूण म्हणजे पायांचा रंग. पायात मोजे घालावे तसा हा रंग असतो. त्याला स्टॉकिंग्ज म्हणतात. हा रंग गव्याला म्हशींपासून वेगळा करतो. नोव्हेंबर ते मार्च हा गव्यांचा प्रजननकाळ असतो.

“गवे सहसा माणसांवर हल्ले चढवत नाहीत. गव्यांमध्ये आपापसात मारामारी होतात पण मुद्दाम त्यांनी माणसावर हल्ला केला असं होत नाही. पुण्यात आलेल्या गव्याने कोणालाही जखमी केलं नाही. कात्रजच्या केंद्रात त्याच्या जखमांवर उपचार करून त्याला सह्याद्री व्याघ्रप्रकल्पात नेणार होते. मात्र प्रचंड गर्दी, आवाज याने तो गोंधळून गेला आणि त्याचा दुर्देवी मृत्यू झाला.”

पुण्याच्या आसपास गव्यांचा अधिवास ऐकिवात नाही. बुधवारी पुण्यात शिरलेला गवा आपल्या कळपापासून भरकटला असावा असं त्यांनी स्पष्ट केलं.

“प्राणी मानवी वस्तीत येतात तेव्हा गोंधळलेले, घाबरलेले असतात. गर्दी न करता त्यांना मोकळीक दिली तर वनविभाग योग्य ती कार्यवाही करून संबंधित प्राण्याला त्याच्या अधिवासाच्या ठिकाणी किंवा जवळच्या जंगलात सोडून देतात. गर्दीला रोखण्यात पोलीस तसंच स्थानिक प्रशासनाची भूमिकाही मोलाची असते.

“पाण्याचा फवारा मारणं तसंच प्राण्याला रोखण्यासाठीच्या प्रयत्नांमध्ये अग्निशमन दलाची महत्त्वाची असते. या विभागांमधील समन्वयातून प्राण्याला परत सुरक्षितपणे जंगलात पाठवता येऊ शकतं. सर्वसामान्य माणसांनी अशा परिस्थितीत घरी राहावं,” असं पेठे यांनी सांगितलं.
असं असले तरी वन विभागाने वेळेवर काहीतरी करून रानगव्याला सुरक्षित स्थळी नेले असते तर या रानगव्याचे प्राण वाचू शकले असते अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *