अवधूत सावंत, प्रतिनिधी : दिवसेंदिवस करोनासारख्या महाभयंकर संसर्गाचे वाढते प्रमाण लक्षात घेता मुंबई पोलिसांनी आता आपल्या कर्मचार्यांना घरून काम करण्याची परवानगी दिली आहे. राज्यभरात कोरोना संसर्गाच्या संख्येत दुपटीने लक्षणीय वाढ होत असल्याने अधिकाधिक लोकांनी घरोघरी राहून काम करावे असे मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी व्यक्त केले होते. अतिरिक्त पोलिस महासंचालक, महाराष्ट्र पोलिसांनी दिलेल्या आदेशानुसार, वर्ग ‘अ’ आणि ‘ब’ अधिकाऱ्यांसाठी १०० टक्के उपस्थिती अनिवार्य असेल. याशिवाय पोलिस मुख्यालयात कार्यरत ‘क’ आणि ‘ड’ प्रवर्गातील कर्मचार्यांची उपस्थिती ५० टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आली आहे. त्यापैकी २५ टक्के ‘क’ आणि ‘ड’ श्रेणी कर्मचार्यांना सकाळी ९ ते सायंकाळी ४ या वेळेच्या शिफ्टनुसार बोलावले जाईल, तर उर्वरित २५ टक्के कर्मचार्यांना सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत बोलावले जाईल. पोलिस ठाण्यातील स्टेशन हाऊस अधिकाऱ्यांना दैनंदिन कामकाजासाठी आवश्यक असणाऱ्या कर्मचार्यांना कामावर बोलावण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. उर्वरित कर्मचारी घरून काम करतील आणि फोनवर उपलब्ध असतील, जेणेकरून आवश्यक असल्यास त्यांच्याशी वेळोवेळी संपर्क साधता येईल.
