Latest News आपलं शहर देश-विदेश

मिरा भाईंदरचे उपमहापौर हसमुख गेहलोत ने कोरोना रुगणांच्या मदतीसाठी दिला 30 लाखांचा निधी!

संपादक: मोईन सय्यद / मिरा भाईंदर, प्रतिनिधी

मिरा भाईंदर शहरात कोरोनाच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. एका बाजूला आधीच महानगरपालिका जवळपास पाचशे कोटीच्या कर्जात बुडालेली असताना कोरोना सारख्या महामारीच्या काळात महापालिकेच्या तिजोरीवर प्रचंड ताण पडलेला आहे. अशा परिस्थितीत नागरिकांना अत्यावश्यक आरोग्य सेवा पुरविण्याचे एक मोठे आव्हान मिरा भाईंदर महानगरपालिका प्रशासन समोर उभे राहिले आहे.

कोरोना महामारीने गंभीर स्वरूपात आजारी असलेल्या ज्या रुग्णांना HRCT चाचणी किंवा प्लाझ्मा देण्याची गरज भासते किंवा त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्याची गरज भासते अशा वेळी महानगरपालिका त्यांचा अतिरिक्त खर्च उचलण्यास असमर्थ ठरत आहे. अशा वेळी महानगरपालिका त्यांना काही आवश्यक चाचण्या आणि उपचार स्वखर्चाने करण्यास भाग पाडत आहे. ज्या रुगणांचे नातेवाईक आर्थिक दृष्ट्या सक्षम आहेत ते आपल्या रुग्णांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करू शकतात परंतु जे नागरिक हा खर्च करण्यास सक्षम नाहीत त्यांची मात्र फारच अडचण निर्माण होते.

त्यामुळे ही परिस्थिती लक्षात घेऊन कोरोनाच्या गरजू रुग्णांना प्लाझ्मा, HRCT, आणि ऑक्सिजन सुविधा मोफत पुरविण्यासाठी मिरा भाईंदरचे उपमहापौर हसमुख गेहलोत यांनी आपला 15 लाखांचा नगरसेवक निधी आणि सोबतच 15 लाखांचा उपमहापौर निधी असा एकूण 30 लाख रुपयांचा निधी कोरोनाच्या रुग्णांना उपलब्ध करून दिला असून त्याबाबतचे पत्र त्यांनी आयुक्त दिलीप ढोले यांना दिले आहे. गेल्या वर्षी देखील त्यांनी अशाच प्रकारे आपले दोन्ही निधी मिळून एकूण 25 लाख रुपये कोरोनाच्या रुग्णांना उपलब्ध करून दिले होते.

मुळात महानगरपालिकेच्या नागरसेवकांना त्यांच्या प्रभागात काही उल्लेखनीय कार्य करायचे असल्यास त्या करीता प्रत्येक नगरसेवकाला त्यांच्या हक्काचा निधी दर वर्षी दिला जातो. गेल्या वर्षी प्रत्येक नगरसेवकांचा निधी साडे बारा लाख होता, यावर्षी तो वाढवून पंधरा लाख करण्यात आला आहे. प्रत्येक नगरसेवक आपला हा निधी आपल्याच प्रभागातील नागरिकांसाठी काहीतरी उल्लेखनीय अशी सुविधा किंवा विकास कार्यासाठी वापरतात.

प्रभागात पाणपोई उभारणे, उद्यानात लहान मुलांना खेळण्यासाठी खेळणी लावणे, लोकांना बसण्यासाठी बेंच लावणे, प्रभागातील चार रस्त्यावर चौक उभारणे, फुटपाथचे सुशोभीकरण करणे अशा प्रकारच्या विकासकामांवर हा नगरसेवक खर्च करून त्यावर संबंधित नगरसेवकांचे नाव कोरले जाते जेणेकरून वर्षानुवर्षे त्या नगरसेवकांची जाहिरात होत राहते. त्यामुळे आपला निधी प्रभागातच अशा प्रकारच्या विकासकामांसाठी वापरण्यावर नगरसेवकांचा कल अधिक असतो.

परंतु भाजपचे नगरसेवक आणि उपमहापौर असलेले हसमुख गेहलोत यांनी मात्र लागोपाठ दोन वेळा आपले दोन्ही निधी कोरोनाच्या रुग्णांना मोफत सुविधा पुरविण्यासाठी उपलब्ध करून दिला असून त्यांनी एक स्तुत्य असा वेगळा पायंडा पाडला आहे व त्याचे अनुकरण इतर नगरसेवकांनी देखील करावे अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *