मिलन शाह, मुंबई प्रतिनिधी : कामगारांच्या न्याय हक्कासाठी शिवसेना सदैव आपल्या पाठीशी आहे अशी ग्वाही शिवसेना उपनेते, म्हाडा सभापती विनोद घोसाळकर यांनी दिली. बोरिवली- दहिसरमधील 500 माथाडी कामगारांनी काल शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. याप्रसंगी बोलताना घोसाळकर यांनी उपस्थितांचे शिवबंधन बांधून शिवसेना पक्षात स्वागत केले.
शिवसेना कधीही जात- धर्म- पंथ मानत नाही. सर्व धर्मियांना- समाजातील सर्वांना सोबत घेऊन जाणारा एकमेव पक्ष शिवसेना असल्याचे त्यांनी सांगितले. शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हा शिवसैनिकांना ही शिकवण दिल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. कामगारांवर जिथे-जिथे अन्याय होईल तेव्हा शिवसेना आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. दरम्यान महिन्याभरापूर्वी आपण कामगारांच्या विविध प्रश्नांबाबत विनोद घोसाळकर यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी तातडीने याप्रकरणी पावले उचलत कामगारांना न्याय मिळवून दिल्याचे कामगार नेते इकबाल पटेल यांनी सांगितले.
याप्रसंगी उपस्थित परवेझ शेख, नौशाद शेख, अहमद शेख, सलमान उस्मानी व सलीम शेख यांनी आभार व्यक्त केले. विशेष म्हणजे यावेळी मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते. याप्रसंगी शिवसेना उपविभागप्रमुख भालचंद्र म्हात्रे, विधानसभा संघटक कर्णा अमीन, माजी नगरसेवक मुंबै बँक संचालक अभिषेक घोसाळकर सहित मोठ्या संख्येने कामगार उपस्थित होते.