
संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
न्युज ब्रॉडकास्टिंग स्टॅंडर्ड अथॉरिटी अर्थात ‘एनबीएसए’ कडून टाइम्स नाऊ, टीव्ही 18 कन्नड आणि सुवर्णा न्युज या ३ वृत्तवाहिन्यावर कारवाई करण्यात आली असून या चॅनेल्स ना दंडासह प्रेक्षकांची जाहीर माफ़ी मागण्यांचे आदेश एनबीएसए ने दिले आहेत.
देशात २०२० मध्ये कोविड-१९ कोरोनाने शिरकाव केल्यानंतर प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. देशात अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झालेली असतानाच यादरम्यान दिल्लीस्थित निजामुद्दीन येथे झालेलं तब्लिकी जमात मरकज चर्चेत आलं होतं दिल्लीत झालेल्या या कार्यक्रमानंतर उपस्थित असलेले लोक वेगवेगळ्या राज्यात परतले त्यानंतर कोविड-१९ कोरोना प्रसारासाठी या घटनेला जबाबदार धरण्यात आलं होतं. या घटनेबद्दल करण्यात आलेल्या वार्तांकनावरुन टाइम्स नाऊ, टीव्ही 18 कन्नड आणि सुवर्णा न्युज या ३ वृत्तवाहिन्यांना दंड ठोठावण्यात आला आहे. त्याच बरोबर प्रेक्षकांची माफी ही मागण्यास सांगण्यात आलं आहे.
न्यूज ब्रॉडकास्टिंग स्टॅंडर्ड अथॉरिटी अर्थात एनबीएसए ने ही कारवाई केली आहे. १३ ते २४ मार्च २०२० च्या दरम्यान निजामुद्दीन मध्ये धार्मिक कार्यक्रम झाला होता या कार्यक्रमात तब्लिगी जमातच्या १६.५०० हजार नागरिकांनी भेट दिली होती. त्यानंतर ३० मार्च २०२० रोजी हा परिसर सील करण्यात आला होता. त्यानंतर कोविड – १९ कोरोनाचा प्रसाराचा ठपका या कार्यक्रमावर ठेवण्यात आला होता.
याच दरम्यान काही वृत्तवाहिन्यांनी आक्षेपार्ह वार्तांकन केल्याचं मत विविध मा. न्यायालयाने नोंदवलं होतं. त्यानंतर आता ‘एनबीएसए’ ने ही कारवाई केली आहे. टाइम्स नाऊ या इंग्रजी वृत्तवाहिनीला या प्रकरणात दोषी धरण्यात आलं असून टीव्ही 18 कन्नड आणि सुवर्णा न्युज या प्रादेशिक वृत्त वाहिन्यांना देखील दंड ठोठावण्यात आला आहे. टाइम्स नाऊ या इंग्रजी वृत्तवाहिनीने तब्लिगी जमात कार्यक्रमाबद्दल आणि नंतर प्रसारित केलेल्या दृश्य जुळतं नसल्याचंही एनबीएसए ने स्पष्टपणे नोंदवले आहे.
ताब्लिगी जमातीच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या मुसलमानांनी देशात जाणीवपूर्वक कोरोना हा रोग पसरवला असा खोटा प्रचार करून मुसलमानांची बदनामी करण्याच्या उद्देशाने अनेक टीव्ही चॅनेल्स आणि प्रसार माध्यमातून खोट्या आणि अतिरंजित बातम्या त्यावेळी प्रसारित केल्या गेल्या होत्या परंतु नंतर मात्र त्या सर्व बातम्या खोट्या असल्याचे सिद्ध झाले होते.