संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत
केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार कोविन ऍपवर झालेल्या नवीन बदलामुळे शहरात सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेंतर्गत ५० टक्के ऑनलाईन नोंदणी करणे बंधनकारक असून ५० टक्केच ‘वॉक इन’ पध्दतीने लस देण्यात येणार आहे. त्यानुसारच सर्व केंद्रावरील दैनंदिन लसीकरणाचे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार असून नागरिकांनी याची नोंद घेण्याचे आवाहन महापालिका आयुक्त डॉ.विपिन शर्मा यांनी केले आहे.
कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी कोविन ऍपवर नोंदणी करणे बंधनकारक असून ऍपमधील नवीन बदलानुसार ५० टक्के ऑनलाईन नोंदणी करणे अत्यावश्यक आहे. त्यानंतरच उर्वरीत ५० टक्के वॉक इन पध्दतीने लसीरकरणास मुभा देण्यात आली आहे.
यासाठी दररोज सायंकाळी ६ वाजता दुसऱ्या दिवशीच्या लसीकरणाचे वेळापत्रक कोविन ऍपवर जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी लसीकरण केंद्रावर गर्दी न करता कोविन ऍपवर जास्तीत जास्त संख्येने ऑनलाईन नोंदणी करून लसीकरणाचा लाभ घेण्याचे आवाहन महापालिका आयुक्त डॉ.विपिन शर्मा यांनी केले आहे.
दरम्यान महापालिका क्षेत्रातील ४५ वर्षावरील नागरिकांचे जास्तीत जास्त लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने आता दर मंगळवार आणि शनिवार या दोनच दिवशी सर्वच लसीकरण केंद्रावर ४५ वर्षावरील नागरिकांना लस देण्यात येणार असून इतर दिवशी ३० ते ४४ वयोगटातील नागरिकांना सर्वच केंद्रावर लस देण्यात येणार आहे तरी नागरिकांनी याची नोंद घेण्याचे आवाहन देखील महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.