संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे २०२१ मध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. मात्र, एक वाजल्यापासून विद्यार्थ्यांना निकाल पाहण्यात अडचणी येत आहेत. यावर आता शालेय शिक्षणमंत्री यांनी दिलगिरी व्यक्त करत दोषी व्यक्तींवर कठोर कारवाई केली करणार असल्याचा इशारा दिला आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ट्विट करत याची माहिती दिली आहे.
दहावीचा निकाल पाहण्यासाठी दिलेल्या दोन्ही वेबसाईट दुपारी एक वाजल्यापासून अद्याप डाऊनच आहेत. निकालाच्या वेबसाईट कधी पूर्ववत होणार याकडे विद्यार्थ्यांसह पालकांचं लक्ष लागलं आहे. वेबसाईट डाऊन का झाल्या याचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. दरम्यान, यावर शिक्षणमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. आज काही तांत्रिक बाबींमुळे शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर दहावीचा निकाल प्राप्त होण्यास अडथळे निर्माण झाले. त्याबद्दल आम्ही दिलगिर आहोत. सदर प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. दोषी व्यक्तींवर कठोर कारवाई केली जाईल जेणेकरून घडल्या प्रकारची पुनरावृत्ती होऊ नये, असे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड दिलगिरी व्यक्त करत म्हणाल्या आहेत.