मिलन शाह, मुंबई : व्हॉट्सॲपने ५ जानेवारीस त्यांच्या प्रायवसी पॉलिसीमध्ये बदल केला. यांनुसार वापरकर्त्याच्या माहितीची व्हॉट्स ॲपच्या पार्टनर कंपनी बरोबर म्हणजेच फेसबुकबरोबर देवघेव होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यांतच जगातील सर्वांत श्रीमंत ठरलेल्या व्यक्तीने म्हणजेच एलन मस्कने ‘Use Signal’ असे ट्विट केल्यामुळे, लोकांनी प्रचंड संख्येने सिग्नल ॲप डाऊनलोड करायला सुरवात केली.
व्हॉट्स ॲप फक्त वापरकर्त्याचे संदेश आणि कॉल्स यांनाच एंड-टू-एंड एनक्रिप्टेड सुरक्षा देते, पण सिग्नल ॲप या बरोबरच तुमच्या सगळ्या माहितीला (डेटाला) एंड-टू-एंड एनक्रिप्टेड सुरक्षा पुरवते. त्यामुळे सिग्नल, टेलिग्राम दोघांनीही व्हॉट्स ॲप आणि फेसबुकवर निषाणा साधला आहे.
व्हॉट्स ॲपच्या या पॉलिसीमुळे ब-याच व्यक्तींनी सिग्नल ॲप डाऊनलोड केले आहे. त्यामुळे सर्वरवर लोड आला आहे.म्हणूनच आम्हाला व्हेरीफिकेशन कोड देण्यास अडचण येत असल्याचे ट्विट खुद्द सिग्नलनेच केले आहे. ॲपल स्टोअरवरील टॉप फ्री ॲप्समध्ये सिग्नलने पहिला क्रमांक मिळवला आहे. व्हॉट्स ॲपला पर्याय म्हणून टेलिग्राम आणि सिग्नलकडे पाहिले जात आहे. परंतु सुरक्षेच्या दृष्टीने सिग्नलच सरस ठरताना दिसत आहे. या ॲपची टॅगलाईन ही ‘Say Hello to Privacy’ अशीच आहे.
सिग्नल हे संदेशाची देवाणघेवाण करणारे ॲप असून ही कंपनी ‘ना नफा’ तत्वावर चालणारी आहे. या ॲपमध्ये वापरकर्ता फोटो, व्हिडीओ पाठवू शकतो, व्हिडीओ कॉल्स करू शकतो. यांत एका गृपमध्ये १५० लोकांना ॲड करता येते. ज्या लोकांना गृपमध्ये ॲड करायचे आहे त्यांना अगोदर तसे नोटिफिकेशन जाते आणि जेंव्हा त्यांना वाटेल तेंव्हाच त्यांना गृपमध्ये समाविष्ट करता येते. सिग्नल ॲप हे फक्त तुमचा मोबाईल क्रमांक विचारते. त्यामुळे आता ‘सिग्नल ॲप’ वापरण्याकडे लोकांचा कल वाढत चालला असल्याचे दिसून येत आहे.