मीरा भाईंदर, प्रतिनिधी : मीरा भाईंदर शहराचा सर्वांगीण विकास मुझफ्फर हुसैन यांच्या नेतृत्वाखाली झाला असून काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून शहरवासीयांना सर्व मूलभूत सोयी, सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम कॉंग्रेसने सत्ताकाळात केले असल्याचे मत मुंबईचे पालकमंत्री, मत्स्य व वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख यांनी व्यक्त केले आहे. मीरा भाईंदर शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने भाईंदर पश्चिम येथील अग्रवाल ग्राउंडवर आयोजित कार्यकर्ता मेळावा व पदवितरण कार्यक्रमात शेख बोलत होते,
ते पुढे म्हणाले की डॉ. बाबासाहेबांनी दिलेली देशाची घटना हा एक धर्मग्रंथ असून काँग्रेस पक्ष त्याच्या आधारावर चालत आला आहे, सर्वधर्मसमभावचा नारा सर्वप्रथम काँग्रेसने दिला आणि आजही आम्ही त्या विचारधारेशी बांधील आहोत, परंतु गेल्या सहा वर्षांपासून देश वेगळ्याच दिशेनं वाटचाल करीत असून मोठमोठ्या उद्योगपतींच्या इशाऱ्यावर मोदी सरकार चालत असून गोरगरीब, शेतकरी, कष्टकरी, कामगार देशोधडीला लागले आहेत.
महिलांवरील अत्याचार वाढले आहेत, महागाईने कहर केला आहे, धर्माधर्मा मध्ये तेढ निर्माण केली जात आहे, नोटबंदी, जीएसटी सारखे निर्णय घेऊन देशाची अर्थव्यवस्था धोक्यात आणली आहे, जे ६० वर्षात काँग्रेसने या देशाला दिले ते विकण्याचे पाप मोदींनी केल्याचा आरोप अस्लम शेख यांनी केला.
सरकारी यंत्रणेला हाताशी धरून विरोधी पक्षाच्या नेत्यांना टार्गेट केले जात असून काँग्रेसने कधी अशा प्रकारे राज्य केले नसल्याचे सांगत राज्यपाल देखील केंद्राच्या इशाऱ्यावर काम करीत असल्याने लोकनियुक्त सरकारला नीट काम करू दिले जात नसल्याने लोकशाही धोक्यात आली आहे, शेजारील राष्ट्रांशी संबंध सलोख्याचे नाहीत त्यामुळे देशाला धोका निर्माण झाला आहे. देश वाचवण्यासाठी पुन्हा काँग्रेस कार्यकर्त्यांनी संघटित होऊन ही हुकूमशाही मोडून काढली पाहिजे.
कोरोनाच्या संकटकाळात काँग्रेस कार्यकर्त्यांनी केलेल्या कामाचे त्यांनी कौतुक केले. कार्यकर्त्यांचा योग्य तो सन्मान राखत त्यांना जिल्हा, तालुका समिती, एस.ई .ओ. आदी ठिकाणी संधी दिली जाईल असे आश्वासन मंत्री अस्लम शेख यांनी यावेळी दिले.
यावेळी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष मुझफ्फर हुसैन यांनीही आपले विचार व्यक्त केले, ते म्हणाले की शहरात काँग्रेस पक्ष्याला जिवंत ठेवण्यासाठी व भ्रष्ट व्यक्तीला त्याची जागा दाखवून देण्यासाठी विधानसभेची निवडणूक लढलो. काँग्रेस पक्ष नेहमी शहराचा विकास नजरेसमोर ठेऊन काम करीत आला असून शहराचा विकास नियोजन आराखडा आम्ही बनवला परंतु भाजप वाल्यांनी सत्तेच्या जोरावर फक्त भ्रष्टाचार केला.
शहराला रस्ते, रुग्णालय, शाळा, परिवहन सेवा, अतिरिक्त पाणी पुरवठा योजना काँग्रेसने आणली परंतु भाजप वाल्यांनी फक्त बॅनर बाजी करून येथील जनतेची फसवणूक केल्याचे हुसेन म्हणाले. यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष प्रमोद सामंत यांच्या नेतृत्वाखाली नवीन जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली, त्यात ३ कार्यकारी अध्यक्ष, उपाध्यक्ष, महासचिव, सचीव, सहसचिव, ब्लॉक अध्यक्ष नियुक्त करण्यात आले. सर्वांना नियुक्ती पत्रे देण्यात आली. प्रदेश सरचिटणीस राजेश शर्मा, सचिव मेहुल व्होरा, सुरेश दळवी, पर्यावरणचे प्रदेश अध्यक्ष समीर वर्तक, वसई विरार काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, युवक अध्यक्ष दीप काकडे, गटनेते झुबेर इनामदार, महिला अध्यक्षा लीलाताई पाटील, जिल्हा प्रवक्ते प्रकाश नागणे यांच्यासह पक्षाचे नगरसेवक, जिल्हा, ब्लॉक चे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मीरा भाईंदर शहरातील काँगेस पक्षाने आता कात टाकायला सुरुवात केली असून गेल्या काही दिवसात काँग्रेस पक्षाने जनतेच्या मूलभूत सुविधांच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. त्याच प्रमाणे शहरातील अनेक वर्षे रेंगाळलेल्या पक्षाच्या नियुक्त्या देखील आता मार्गी लावल्या जात असल्याचे दिसून येत असून सोमवारी 11 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात शेकडोंच्या संख्येने नवीन नियुक्या केल्या आहेत.