संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधूत सावंत
मिरा भाईंदर- मिरा भाईंदर शहराच्या महिला आमदार गीता जैन यांचा भाऊ संजय पुनमिया आणि विकासक सुनील जैन यांना खंडणीच्या एका प्रकरणात अटक झाली असून याच प्रकरणात माजी पोलीस महासंचालक परामबीर सिंह मुख्य आरोपी असून आणखीन पाच पोलीस अधिकारी सह आरोपी आहेत. विकासक श्याम सुंदर अग्रवाल यांनी दिलेल्या फिर्यादी वरून एकूण आठ जणांविरोधात मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परमबीर सिंग यांच्यासह डीसीपी अकबर पठाण, पोलीस अधिकारी श्रीकांत शिंदे, पीआय आशा कोरके, नंदकुमार गोपाळे, संजय पाटील, विकासक सुनील जैन आणि संजय पुनमिया यांच्याविरोधात मरीन ड्राईव्ह पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद क्रमांक २९९/२१ नुसार भादंवि कलम ३८७, ३८८, ३८९, ४०३, ४०९, ४२०, ४२३, ४६४, ४६५, ४६७, ४६८, ४७१, १२० (ब), १६६, १६७, १७७, १८१, १८२, १९३, १९५, २०३, २११, २०९, २१०, ३४७, १०९, ११०, १११, ११३ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यात सुनील जैन आणि संजय पुनामिया यांना अटक करण्यात आली असून अटक झालेला आरोपी संजय पुनमिया मिरा भाईंदरच्या आमदार गीता जैन यांचा सख्खा भाऊ आहे तर दुसरा आरोपी सुनील जैन हा देखील त्यांचा निकटवर्तीय आहे.
या बाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मीरा भाईंदर महानगरपालिकेचे नगर रचना विभागाचे सहायक नागरारचनाकार दिलीप घेवारे यांनी काही विकासकांशी संगनमत करून यूएलसीचा हजारों कोटींचा घोटाळा केला. या यूएलसी घोटाळा प्रकरणात मिरा भाईंदर शहरातील जवळपास चाळीस पेक्षा जास्त विकासकांवर गुन्हे दाखल झाले होते. त्यापैकी मनोज पुरोहित, रातीलाल जैन, शैलेश शाह सारख्या काही विकासकांना अटक देखील झाली होती. त्यावेळेस या प्रकरणात अटक टाळण्यासाठी अनेक विकासकांकडून सुनील जैन आणि संजय पुनमिया यांच्या माध्यमातून त्यावेळी ठाणे पोलीस आयुक्त असलेले परमबीर सिंह यांनी कोट्यवधी रुपयांची प्रमाणात खंडणी मागितली असा आरोप ठेवण्यात आला आहे. अशाच प्रकारे यूएलसी प्रकरणातील गुन्हे रद्द करण्यासाठी श्याम सुंदर अग्रवाल यांचे कडून देखील 15 कोटींची खंडणी मागीतल्याचा आरोप त्यांनी दिलेल्या फिर्यादी मध्ये नमूद करण्यात आले असून त्यावरून मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक आरोपी सुनील जैन आणि संजय पुनमिया यांना कोर्टाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
परमबीर सिंग यांच्या मागे लागला चौकशीचा ससेमिरा!
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या १०० कोटी वसुली टार्गेटच्या आरोपांमुळे देशमुखांमागे ‘ईडी’चा ससेमिरा लागला असला तरी, हे आरोप करणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंगदेखील चांगलेच अडकले आहेत. परमबीर सिंग यांच्याविरोधात करण्यात आलेल्या भ्रष्टाचारांच्या तक्रारींवरून राज्य शासनाने त्यांच्या खुल्या चौकशीची परवानगी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला (एसीबी) दिली असतानाच मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात एका बांधकाम व्यावसायिकाच्या तक्रारीवरून माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यासह ८ जणांविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज्याचे तत्कालीन गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अनिल देशमुख यांच्यावर परमबीर सिंग यांनी मुंबईतील पोलीस अधिकाऱ्यांना १०० कोटींच्या वसुलीचे टार्गेट दिल्याचा गंभीर आरोप केला होता. त्यानंतर मात्र परमबीर सिंग यांच्या विरोधातही गैरकारभार आणि भ्रष्टाचारांच्या तक्रारीचे सत्र सुरू झाले. अकोला पोलीस दलातील पोलीस निरीक्षक भीमराव घाडगे यांच्या तक्रारीवरून परमबीर सिंह यांच्यासह २७ पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध अकोल्यातील सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करुन पुढील तपासासाठी ठाणे पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.
ठाणे शहर पोलीस आयुक्तपदी असताना परमबीर सिंग यांनी पदाचा गैरवापर करत हजारो कोटींचा भ्रष्टाचार केला. तसेच आपल्या आणि आपल्या कुटुंबीयांच्या नावे हजारो कोटींची माया गोळा केल्याची तक्रार पोलीस निरीक्षक भीमराव घाडगे यांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांसोबतच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस महासंचालक यांच्याकडे केली आहे. घाडगे यांच्या तक्रारीसोबतच मुंबई पोलीस दलातील पोलीस निरीक्षक अनुप डांगे यांनीही परमबीर सिंग यांच्याविरोधात तक्रार केली आहे.
क्रिकेट बुकी सोनू जालान याने परमबीर सिंग यांच्यासह अन्य पोलीस अधिकाऱ्यांवर आपल्याला खोट्या गुन्ह्यात अटक करून मकोका गुन्हा लावून ३ कोटी ४५ लाख रुपयांची वसुली केल्याची तक्रार केली आहे. याशिवाय केतन तन्ना यांनीही परमबीर सिंग यांच्यावर वसुलीचे आरोप केला आहे. सव्वा कोटी रुपयांची वसुली केल्याचा त्यांनी दावा केला आहे. त्यापाठोपाठ आता मरीन ड्राइव्ह पोलिसांकड़ून तपास सुरु करण्यात आला आहे.