मिलन शाह, मुंबई प्रतिनिधी : मुंबई पोलिस आता मुंबईमधील रस्त्यावर, घरोघरी भीक मागणाऱ्या भिकार्यांविरुद्ध कारवाई करण्याच्या तयारीत आहेत. मुंबई पोलिसांकडून भिक्षेकरी पकडण्याची मोहीम राबविण्यात येणार आहे. रस्त्यांवरील भिकार्यांना पकडून त्यांना चेंबुर येथील भिक्षेकरी स्वीकार केंद्र येथे ठेवण्यात येणार आहे.
भिक्षेकरी पकड मोहिमेंंतर्गत मुंबईच्या रस्त्यांवरील भीक मागणार्या लोकांना मुंबई पोलिस ताब्यात घेणार आहे. फेब्रुवारीपासून या मोहिमेला सुरवात करण्याचे आदेश पोलिस सहआयुक्त विश्वासराव नांगरे पाटील यांनी दिले आहेत. त्यांची कोविड चाचणी करून त्यांची रवानगी चेंबूर येथील भिक्षेकरी स्वीकार गृहामध्ये करण्यात येईल.
भीक मागणे हा कायद्याने गुन्हा असून याचे पालन मुंबई पोलिस आता काटेकोरपणे करणार आहेत. मुंबईमध्ये दिवसेंदिवस भिक्षेकरांची संख्या वाढत आहे आणि या वाईट परिस्थितीला देखील आपला व्यवसाय बनवणार्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे पोलिसांनी आता या मोहिमेला सुरुवात केली आहे.
मुंबईतील पहिली कारवाई आझाद मैदान पोलीस ठाण्याच्या पथकाकडून करण्यात आली. आझाद मैदान पथकाने त्यांच्या हद्दीतील १४ भिक्षेकर्यांना ताब्यात घेऊन त्यांची कोविड चाचणी करून त्यांना चेंबूर येथील भिक्षेकरी स्वीकार गृहामध्ये पाठविण्यात आले. भीक मागण्यासाठी विशेष करून लहान मुलांचा वापर केला जातो. काही वेळेला मुले चोरून त्यांना भीक मागायला प्रवृत्त केले जातें.
लोकांची सहानुभूती मिळवून जास्त पैसे मिळावे म्हणून नुकतच जन्मलेल्या बाळाला हे लोक उपाशी ठेवतात, ते बाळ सतत रडत राहावे, म्हणून त्याला नाहक त्रास देतात. त्या बाळाची पिळवणूक होत असते. काही लोकांसाठी भीक मागणे हा व्यवसाय बनला आहे. दिव्यांग असल्याचे नाटक करून किंवा एखादा गंभीर आजार असल्याचे खोट सांगून लोकांकडून पैसे घेतले जातात. पैसे कमवण्यासाठीचा हा सर्वात सोयीस्कर मार्ग काहींसाठी झाला आहे.
भीक मागणे ही इतकी वाईट अवस्था आहे, की आपल्या शत्रूवरही अशी वेळ येऊ नये असे म्हटले जाते; पण त्याचा गैरवापर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. त्याला आळा घालण्यासाठी मुंबई पोलिस सज्ज झाले आहेत. आदेश आल्याबरोबर पोलिसांनी युद्ध पातळीवर कारवाई सुरू केली आहे. तसेच येणार्या दिवसात सुद्धा अशाच प्रकारे धडक कारवाया मुंबई पोलिसांकडून सुरू ठेवण्यात येणार असल्याचे नांगरे पाटील यांच्याकडून सांगण्यात आले आहे.